Ratnagiri News| जगबुडी नदीपात्रात कचर्‍याचे ढीग; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

नदीच्या नैसर्गिक प्रवाहावरही परिणाम होण्याची भीती
Ratnagiri News
जगबुडी नदीपात्रात कचर्‍याचे ढीग; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
Published on: 
Updated on: 

खेड : खेड-शिव मार्गालगत भोस्ते व अलसुरे गावांच्या सीमा भागात जगबुडी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. नदीपात्रात साचलेल्या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून खेडहून शिव गावाकडे जाणार्‍या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

नदीपात्रात टाकण्यात आलेल्या कचर्‍यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या तसेच विघटन न होणारे विविध घटक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नदीपात्रात कचरा साचून गाळाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून नदीच्या नैसर्गिक प्रवाहावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. जगबुडी नदी खेड शहराच्या जवळून वाहत असल्याने नदीपात्रात टाकलेला कचरा पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे वाहून जाण्याची शक्यता आहे.

भरतीच्या पाण्यामुळे हा कचरा नदीच्या पुढील भागात वाहून जाऊन शहरालगतच्या नदीकिनारी पोहोचत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नदीकिनारी अनेक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. त्यामुळे नदीपात्रातील वाढत्या कचर्‍यामुळे जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊन त्याचा परिणाम पाणीपुरवठा योजनांवर व नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. नदीपात्राचा कचरा टाकण्यासाठी वापर होऊ नये, यासाठी संबंधित ग्रामपंचायती, तालुका प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news