

रत्नागिरी : शहरातील छत्रपती नगर परिसरातील हसिना अन्वर काझी यांचे बंद घर फोडून चोरट्याने सुमारे 14 तोळ्याचे दागिने व 40 हजार रोख असा सुमारे दहा लाखांहून अधिक ऐवजावर डल्ला मारला. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, शहर पोलिस याचा कसून शोध घेत आहेत.
शहरातील छत्रपतीनगर येथील आगाशे मॉलनजीक ही घटना घडली. घरमालकांची पत्नी विश्रांतीसाठी भावाकडे वास्तव्याला गेल्या होत्या. सोमवारी घर मालक आपल्या बंगल्यात येऊन गेले होते. सोमवारी कोजागरी असल्याने रात्री उशिरापर्यंत शहर व परिसरात राबता होता. मात्र मध्यरात्री तीन-चार वेळा लाईट जाण्याचे प्रकारही घडले होते. त्यातच रात्रभर पावसाची रिपरिपही सुरू होती.
या गोष्टींचा फायदा चोरट्याने उठवल्याचे दिसून येत आहे.
चोरट्याने बंगल्याचा पुढील दरवाजा फोडून आत प्रवेश केला व बेडरुममध्ये जाऊन लोखंडी कपाट उघडल. कपाटातील मंगलसूत्र अंगठी, कानातील कुडी, सोन्याची चेन असे 14 तोळे दागिने चोरुन नेले. यात 40 हजार रोख रक्कमही लांबवली. याप्रकरणी हसिना अन्वर काझी यांनी तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेनंतर पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.