

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेला व पर्यटकांचे आकर्षण असलेला ऐतिहासिक राजकोट किल्ला पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर मंगळवार पासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. यामुळे दिवाळी सुट्टीमध्ये मालवणमध्ये आलेल्या पर्यटकांना तसेच स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना दिलासा मिळाला. पुतळा व किल्ला परिसराच्या दुरुस्तीकामासाठी दोन दिवसांपूर्वी हा पुतळा व किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.
यंदा दिवाळी सुट्टीत मालवणमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. मात्र, वादळी पावसामुळे व समुद्र खवळल्याने ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग, तसेच जलक्रीडा बंद आहेत. तर दोन दिवसांपूर्वी अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कारणास्तव राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद केला. यामुळे पर्यटकांचा पुरता हिरमोड होत होता. शिवाय स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनाही याचा फटका बसला होता.
याबाबत स्थानिक पर्यटन व्यवसायिकांनी सामाजिक कार्यकर्त्यां शिल्पा खोत यांची भेट घेत त्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले होते. यावर शिल्पा खोत यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्फत ही बाब पालकमंत्री नीतेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. मंत्री राणे यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी तहसीलदारांना मंगळवार पासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे निर्देश दिले. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार, राजकोट किल्ला मंगळवार पासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. यामुळे पर्यटक व स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. किल्ला तात्काळ खुला केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत यांनी पालकमंत्री नीतेश राणे, आ.नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच सार्व. बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.