

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कासवगतीने होणारी वाहतूक, जागोजागी पडलेले खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे सद्या महामार्गाची वाट बिकट बनली आहे. अनेक ठिकाणी सद्या चिखलामुळे घसरगुंडीचे डाव रंगले आहेत. वाहनचालकांना विशेषकरून मोटारसायकलस्वारांना वाहन चालवणे जिकिरीचे बनले आहे. छोटे-मोठे अपघातही होत आहेत. प्रशासनाने मात्र डोळेझाक करत गांधारीची भूमिका घेतली आहे. संबंधित ठेकेदाराने मात्र काम करताना योग्य काळजी न घेतल्याने अपघाताचे प्रमाण हे वाढतच निघाले आहे.
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहिलेल्या समृद्धी महामार्गाचे काम सहा वर्षात पूर्ण झाले; मात्र मुंबई - गोवा महामार्गाचे काम 16 वर्षे झाली तरी अद्याप अपूर्णच आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 कि.मी. चा असून तो सहा वर्षात पूर्ण झाला तर मुंबई-गोवा महामार्ग 471 कि.मी.चा असूनही सोळा वर्ष उलटली तरी पूर्ण झालेला नाही. समृद्धी महामार्ग सहा वर्षात पूर्ण होतो, मात्र मुंबई-गोवा महामार्गाला 16 वर्ष का लागतात, हा कोकणवासीयांचा प्रश्न आजही प्रश्नच राहिला आहे.
गोवा महामार्गाच्या आरवली ते लांजा हा जवळपास 60 कि.मी.च्या महामार्गाचे काम रखडलं आहे. सध्या संथगतीने काम सुरू आहे. कोकण - विकासाच्या समृद्धीचे रडगाणे सोळा वर्षानंतरही गातच राहावे......! असे म्हणण्याची वेळ कोकणवासीयांवर आली आहे.? ? मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला दिरंगाई केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांना काढून नव्याने तिसर्या ठेकेदाराला काम दिले तरीही हे काम अपूर्णच आहे.
संथगतीने चालणार्या या कामामुळे अनेक ठिकाणी महामार्गावर अपघात झाले आहेत. या अपघातात अनेक निष्पाप प्रवाशांचे बळी गेले आहेत.? ? हा महामार्ग लवकर पूर्ण व्हावा यासाठी पत्रकार, विविध संघटना, राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे, उपोषणे, धरणे अशी अनेक आंदोलने केली आहेत. तरीही हा महामार्ग आजही अपूर्णच आहे. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था महामार्गाची आहे. कोकणातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मागेच पडला असून, कोकणवासीयांना कित्येक वर्षांपासून न्याय मिळाला नाही. कोकणवासीयांचा अंत सरकार आणखी किती दिवस पाहणार? असा सवालही प्रवाशांतून विचारला जात आहे.
सध्या संगमेश्वर शास्त्रीपूल ते हातखंबा तिठा या मार्गावर वाहन चालवणे जिकिरीचे बनले आहे. गेले 4 ते 5 दिवस पाऊस पडत आहे. यामुळे या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शेवटी याचा फटका वाहनचालकांना बसत असून छोटे-छोटे अपघात होत आहेत. निवळी घाट तसेच संगमेश्वर पैसाफंड हायस्कूलसमोर चिखलामुळे घसरगुंडीचा डाव रंगलेला पाहायला मिळत आहे. वास्तविक पाऊस तोंडावर असताना संबंधित ठेकेदारांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या पूर्णत्वाबाबत अनेक राजकीय नेत्यांनी आश्वासने दिली; परंतु निवडणूक संपताच ती हवेत विरुन गेली. 16 वर्षांच्या या काळात महामार्गाच्या कामासाठी हजारो कोटी रुपये मंजूर झाल्याचे कागदोपत्री दिसते; परंतु प्रत्यक्षात बर्याच ठिकाणी अर्धवट रस्ते, पुलांची तसेच उड्डाणपुलाची अपूर्ण कामे आणि रखडलेले बायपासचे कामे आजही पडून आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी व नेत्याकडून अपेक्षित पाठपुरावाच होत नसल्याने महामार्गांच्या कामाला योग्य गती मिळत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासन आणि राज्यकर्त्यांविषयी मोठा असंतोष आहे.