

रत्नागिरी : गणेशोत्सव बुधवारपासून सुरू होत असून मुंबई, पुण्यासह अन्य शहरांमधून कोकणातील गणेशभक्त आपल्या मूळगावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने निघाले आहेत. मात्र त्यांच्या या आनंदमय प्रवासाला मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण आणि सदोष कामांमुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे. गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेले या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि जे भाग पूर्ण झाले आहेत त्यातही अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. या महामार्गावरील सध्याची स्थिती पाहता प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उदासीनतेमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन जवळपास 14 वर्षांचा काळ लोटला आहे. तरीही अनेक ठिकाणी रस्ते अपूर्ण आहेत. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर, तसेच प्रमुख शहरांच्या जवळच्या भागात कामाची गती अत्यंत संथ आहे. यामुळे प्रवासाचा वेळ तर वाढलाच आहे; पण रस्त्याच्या खराब स्थितीमुळे वाहनांचे नुकसान होण्याचे प्रकारही वाढले आहेत. रस्त्यांवरील खड्डे, अर्धवट टाकलेले डांबर आणि खराब बांधकाम यामुळे प्रवाशांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
निवळी व हातखंबा यांसारख्या अत्यंत वर्दळीच्या आणि उतारावरील भागात रस्त्यांची स्थिती जास्तच धोकादायक बनली आहे. येथील घाटाच्या उतारावर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय स्पीडब्रेकर्स? ? टाकण्यात आले आहेत. या स्पीडब्रेकर्सवर पांढरे पट्टे? ? किंवा रात्रीच्या वेळी दिसणारे रिफ्लेक्टर लावलेले नाहीत. तसेच, पुढे स्पीडब्रेकर आहे, असा कोणताही सूचना फलक तिथे लावण्यात आलेला नाही. यामुळे वेगात येणार्या वाहनांना अचानक ब्रेक मारावा लागत आहे, ज्यामुळे मागून येणारी वाहने धडकण्याची शक्यता वाढली आहे.
महामार्गाचे काम राष्ट्रीय सार्वजनिक विभागाच्या देखरेखीखाली सुरू आहे. मात्र, त्यांच्याकडून या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. रस्त्याच्या दुर्दशेबद्दल अनेक तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांसाठी सरकार विशेष सुविधा जाहीर करत असताना, या महामार्गाची अवस्था दयनीय आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास अपघात वाढून मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने अपूर्ण कामे पूर्ण करावीत आणि सदोष कामांची दुरुस्ती करावी, अशी मागणी कोकणवासीयांनी केली आहे.