Ratnagiri rain update | जिल्ह्यात मंगळवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; पावसाच्या ‘रेड अलर्ट’मुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Ratnagiri News
प्रातिनिधीक छायाचित्रPudhari File Photo
Published on
Updated on

रत्नागिरी: भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या म्हणजेच मंगळवार, दिनांक ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, ७ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची तीव्र शक्यता आहे. जिल्ह्यात आधीच अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, खेड तालुक्यातील 'जगबुडी' नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील खालील सर्व संस्थांना उद्या सुट्टी असेल:

​सर्व अंगणवाड्या आणि पूर्व-प्राथमिक शाळा

​सरकारी व खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा

​जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा

​सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा

​सर्व आश्रमशाळा

​सर्व महाविद्यालये

​आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील सर्व शैक्षणिक संस्था

​आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ आणि ३० मधील अधिकारांचा वापर करून जिल्हा प्रशासनाने हा आदेश जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news