

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, मे आणि जून महिन्यात पावसाने रेकॉर्डब्रेक हजेरी लावली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही पावसाचा जोर कायम होता. मात्र, आता मागील तीन दिवसांपासून शहरासह तालुक्याच्या ठिकाणीही पावसाचा जोर ओसरू लागला आहे. उन्ह पडू लागले आहे. 1 ते 13 जुलै कालावधीत यंदा 10 हजार मि.मी इतका पाऊस झाला तर गतवर्षी 12409.30 मि.मी. इतका पाऊस पडला आहे त्यामुळे अडीच हजार मि.मी. पाऊस कमी झाल्याचा आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान,जिल्ह्यात पाऊस कमी होत असल्यामुळे भात लागवडीस अडचण येत असून शेतकर्यांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कोकणात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली असून मे आणि जून महिना कोकणासाठी लकी ठरला असून सर्वाधिक पाऊस झाला आहे. मान्सून एक आठवड्यापूर्वीच आल्यामुळे पावसाने रौद्ररूप धारण केले होते. राज्यासह कोकणात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर मान्सून महिन्यात ही पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला धू धू धुतले होते. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी दरडी कोसळले तर काही ठिकाणी रस्ते खचले होते. मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. ती वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आली. तसेच पावसाने कित्येक शेतकर्यांचे नुकसान झाले, घरांची पडझड, जनावरे दगावली. वीज पडून काही जणांचा मूत्यू झाला. दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस बरसत आहे. मात्र मागील तीन दिवसांपासून पाऊस थोडा कमी झाला असून सलग सूर्यनारायणाचे दर्शन ही झाले आहे. पावसाने उघडीप घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला; मात्र शेतकर्यांना फटका बसत आहे. पाऊस कमी होत असल्यामुळे भात लागवडीस अडचण येत आहे. त्यामुळे मुसळधार पावसाकडे शेतकर्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावत धो धो पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्यात ही पावसाने जोर धरला होता. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 90 टक्यांहून अधिक खरीप पेरण्यापूर्ण झाल्या आहेत. मात्र आता मागील तीन दिवसापासून पावसाचा जोर ओसरू लागला असून, दिवसा ऊन पडत असून राजापूर, चिपळूण, खेड, लांजा तालुक्यात काहीसा पाऊस पडत आहे. जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पाऊस कमी झाला असून भात लागवडीसाठी शेतकर्यांना अडचण ठरत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यात धो धो पाऊस पडला होता. मात्र, जुलै महिन्यात 1 जुलै ते 13 जुलै दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. गतवर्षी या कालावधीत 12 हजार 409 मि.मी पाऊस तर सरासरी 1378.81 इतका पाऊस झाला तर यंदाच्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात 10 हजार 44 मि.मी तर सरासरी 1116.7 मि. मी. इतका पाऊस झाला आहे.