

Ratnagiri Flood
रत्नागिरी : मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. विशेषतः दक्षिण रत्नागिरीला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान खात्याने दिलेल्या ‘रेड अलर्ट’च्या इशार्यानुसार जिल्ह्यात, विशेषतः दुर्गम भागांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यांतील अनेक ग्रामीण भागांमध्ये पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मिर्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नाणिज येथे रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात माती रस्त्यावर आल्याने वाहतूक एकाच मार्गीकेतून सुरू ठेवण्यात आली होती.
शुक्रवारपासून दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरी तालुक्यात पावस पंचक्रोशीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून, प्राथमिक अंदाजानुसार दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. मिर्या-नागपूर महामार्गावर नाणिज येथे उड्डाणपुलाजवळ सुरू असलेले बांधकाम कोसळल्याने सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचले. यामुळे अनेक लहान-मोठी वाहने अडकून पडली होती. स्थानिक ग्रामस्थांनी मध्यरात्रीपासून पहाटे पाच वाजेपर्यंत मदतकार्य करत अनेक वाहनांना मार्गस्थ केले. भाजीपाला घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येणार्या गाड्यांना पुढे पाठवण्यात आले, तर मोठ्या गाड्या दाभोळे-लांजा मार्गे वळवण्यात आल्या. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, एक मारुती कार देखील यात अडकून पडली होती.
मुंबई-गोवा महामार्गालाही पावसाचा मोठा तडाखा बसला. निवळी घाटात मोठ्या प्रमाणात चिखलयुक्त पाणी एका मार्गिकेवरून वाहू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला.
लांजा शहरातही काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. ग्रामीण भागातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत होते, ज्यामुळे शेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाले. राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागालाही पावसाने चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी पाणी भरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. प्रसिद्ध आडिवरे येथील पुरातन महालक्ष्मी मंदिराच्या परिसरातही पाणी साचले होते.
उत्तर रत्नागिरीत मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी होता. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. शुक्रवारी आणि शनिवारी या भागातही चांगला पाऊस झाला. मात्र, सातत्याने कोसळणार्या पावसामुळे भातरोपांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकरी वर्ग चिंतेत आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरीत दिवसभर पाऊस कोसळत असल्याने, नागरिकांची तारांबळ उडाली होती. दिवसभर काळेकुट्ट वातावरण होते. पावस परिसरात पावसासह धुकेही पसरले होते. रस्त्यांची कामे, महावितरणसह अन्य कामांसाठी रस्ते व डोंगरांची होत असलेली खोदाई यामुळे पाण्याचे प्रवाह बदलले आहेत. काही वेळा पाऊस धो धो पडत असल्यानेही सखल भागात पाणी भरल्याची प्रतिक्रिया भाजपा तालुकाध्यक्ष दादा दळी यांनी व्यक्त केली. कामांकडे ठेकेदार व अधिकारी लक्ष देत नसल्यानेच असे प्रकार होत असल्याचे ते म्हणाले.