Ratnagiri News : डासांची उत्पत्ती रोखा; डेंग्यूला आळा घाला

जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्‍ये यांचे आवाहन; जुलै 'डेंग्यू प्रतिरोध महिना'
डासांची उत्पत्ती
डासांची उत्पत्ती Pudhari File Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जुलै महिना 'डेंग्यू प्रतिरोध महिना' म्हणून साजरा करण्यात येत आहे. जिल्हाभर डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती आणि विविध प्रतिबंधात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा, घरातील व परिसरात पाणी साचू देऊ नये, तसेच डासमुक्त रत्नागिरी जिल्ह्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे. जिल्‍ह्यात जानेवारीपासून आजअखेर ११ डेंग्यू रुग्ण आढळल्‍याचे सांगण्यात आले.

डेंग्यू हा एडिस जातीच्या डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. या डासाच्या शरीरावर काळे-पांढरे पट्टे असल्यामुळे त्याला 'टायगर मॉस्किटो' असेही म्हटले जाते. हा डास प्रामुख्याने दिवसा चावत असल्याने कमी वेळेत अनेक व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखणे, हाच डेंग्यू नियंत्रणाचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

घरातील व परिसरातील पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुलर, फ्रीजचा ट्रे, वापरात नसलेले टायर, नारळाच्या करवंट्या, भंगार साहित्य आणि इतर भांड्यांमध्ये स्वच्छ पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून एकदा 'कोरडा दिवस' पाळून सर्व पाण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ व कोरडी करावीत. तसेच पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करणे, डासप्रतिबंधक क्रीमचा वापर करणे, मच्छरदाणीचा वापर करणे आणि घरांच्या दारे-खिडक्यांना जाळ्या बसविणे या उपाययोजना प्रभावी ठरतात.

डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांनी मच्छरदाणीचा वापर करून इतरांना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार, पुरेसा द्रव आहार आणि विश्रांती घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

ही आहेत लक्षणे

डेंग्यूची लक्षणे दिसून आल्यास ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, मळमळ, उलट्या, पुरळ आणि अशक्तपणा अशी लक्षणे जाणवू शकतात. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. स्वतःहून औषधोपचार करू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news