

रत्नागिरी : ग्रामीण भागातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची ११६ पदे रिक्त असताना जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्यांपैकी तब्बल १३५ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश मंत्रालय पातळीवरून आले असून, हे अधिकारी कार्यमुक्त झाल्यास आरोग्य यंत्रणेचे जिल्ह्यात तीनतेरा वाजण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर नवीन अधिकारी हजर होईपर्यंत या अधिकाऱ्यांना न सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना थेट उपकेंद्राच्या पातळीवर वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी शासनाने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची ३५१ पदे मंजूर केली आहेत. मात्र, आजच्या घडीला यातील केवळ २३५ पदांवर आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत.
नवीन भरती पूर्ण होऊन मंजूर ३५१ पदांवर नवीन अधिकारी रुजू होत नाहीत, तोपर्यंत या १३५ अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर सोडले जाणार नाही, अशी ठाम भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.जिल्हा प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला असून, आता वरिष्ठ स्तरावरून यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.