

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून तापमान व आर्द्रतेमुळे उष्माघाताचा चोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तीव्र उन्हात अनावश्यक फिरणे टाळावे व आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या सूचनेनुसार तसेच डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार या कक्षांमध्ये रुग्णांसाठी बेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पंखे तसेच आवश्यक औषधोपचार साहित्य उपलब्ध केले आहे. तसेच प्रत्येक संस्थेत ओआरटी कॉर्नर तयार केले आहेत. याशिवाय वाढत्या उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती ओपीडी, गृहभेटी व समाजमाध्यमांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
उष्माघात तीव्र उन्हात कष्टाची कामे करणे, कारखान्यांतील उष्ण वातावरणात काम करणे, जास्त तापमानाच्या जागी दीर्घकाळ राहणे, घट्ट व उष्णता शोषणारे कपडे वापरणे इत्यादी कारणांमुळे उष्माघात होऊ शकतो.
उष्माघाताची मळमळ, उलटी, हात-पायात गोळे येणे, तीव्र थकवा, शरीराचे तापमान वाढणे, त्वचा गरम व कोरडी पडणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, डोकेदुखी, छातीत धडधड, मानसिक अस्वस्थता किंवा बेशुद्धावस्था ही प्रमुख लक्षणे आहेत.
तसेच लहान मुले, गरोदर महिला, वयोवृद्ध व्यक्ती, खेळाडू, सतत उन्हात काम करणारे कामगार तसेच हृदय, फुफ्फुस किवा मूत्रपिंड विकार असलेले रुग्ण यांना अधिक धोका असतो. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावीत,
तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळावे, सैल, हलक्या रंगाचे सूती कपडे वापरावेत, भरपूर पाणी पिणे व शरीरात पाण्याची कमतरता होऊ न देणे, लिंबूपाणी, ताक, लस्सी, नारळपाणी यांचा आहारात समावेश करणे, बाहेर पडताना टोपी, छत्री, गॉगल्स यांचा वापर करणे, वाहनात मुले किंवा पाळीव प्राणी एकटे सोडू नयेत हे आहेत.
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास काय करावे?
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास रुग्णाला त्वरित सावलीत आणावे, कपडे सैल करावेत व थंड पाण्याने शरीर पुसून तापमान कमी करावे, रुग्णाला थंड, हवेशीर जागी ठेवावे. शुद्धीवर असल्यास पाणी किंवा जलसंजीवनी द्यावी, काखेखाली आईस पॅक ठेवावेत व कपाळावर थंड पट्ट्या ठेवाव्यात, रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा किंवा १०८ अॅम्बुलन्स सेवेला कॉल कराबा.