Ratnagiri News : हर्णे बंदरात सुरमईचे दर निम्म्यावर; खवय्यांची चंगळ!

८०० ते १००० रुपयांची सुरमई आता ४०० रुपयांवर; नवरात्रौत्सवामुळे मागणी घटल्‍याने दरात घसरण
Ratnagiri News
हर्णे बंदरात सुरमईचे दर निम्म्यावर; खवय्यांची चंगळ!
Published on: 
Updated on: 

दापोली : दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णे बंदरात सुरमईच्या दरात मोठी घसरण झाली असून, एरव्‍ही ८०० ते १००० रुपये किलो दराने विकली जाणारी सुरमई सध्या ४०० रुपये किलोवर आली आहे. समुद्रातून ताज्या मासळीची आवक वाढल्याने आणि नवरात्रोत्सवामुळे मागणीत घट झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. सुरमईचे दर निम्म्यावर आल्याने खवय्यांची चंगळ झाली असली तरी मच्छीमारांच्या उत्पन्नावर मात्र त्याचा परिणाम होत आहे.

हर्णे बंदरातील ताज्या सुरमईला बाजारपेठेत नेहमीच चांगली मागणी असते. त्यामुळे या मासळीला तुलनेने अधिक दर मिळतो. मात्र, यंदा नवरात्रोत्सवाच्या काळात उपवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याने मासळी खरेदीवर परिणाम जाणवत आहे. त्यातच समुद्रातून मासळीची आवक वाढल्याने सुरमईचे दर घसरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनाही कमी दरात सुरमई खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात सुमारे १५ दिवस बंद असलेली मासेमारी पुन्हा सुरू झाल्यानंतर मच्छीमारांना चांगल्या दराची अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर लगेचच नवरात्रोत्सव सुरू झाल्याने मासळीच्या मागणीवर मर्यादा आल्या आहेत. पर्यटकांची वर्दळ कमी झाल्याचाही बाजारपेठेवर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे यंदा हर्णे बंदरात सुरमईच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे.

हर्णे बंदरात सुरमईसह पापलेट, कोळंबी, बांगडा, मांदेली, सौंदडा, बोंबील, चिंबोऱ्या आदी विविध प्रकारची मासळी विक्रीसाठी येते. मात्र, बंदरात पुरेशा कोल्ड स्टोरेजची सुविधा नसल्याने बोटीतून आणलेली मासळी त्याच दिवशी विकावी लागते. परिणामी, बाजारात दर कमी असले तरी मासळी साठवून ठेवण्याचा पर्याय मच्छीमारांकडे मर्यादित असतो. त्यामुळे अपेक्षित दर न मिळाल्यास त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

एकीकडे डिझेल आणि मासेमारीसाठी लागणाऱ्या साहित्याचा वाढता खर्च, तर दुसरीकडे मासळीच्या दरातील घसरण, अशा दुहेरी कात्रीत मच्छीमार सापडले आहेत. नवरात्रोत्सव संपल्यानंतर मासळीची मागणी वाढेल आणि सुरमईचे दर पुन्हा सुधारतील, अशी अपेक्षा मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news