

दापोली : हर्णे किनाऱ्यालगत समुद्रात सुरू असलेल्या डिझेल तस्करीचा मोठा पर्दाफाश करत सीमाशुल्क विभागाने ‘रत्ना माऊली’ या मासेमारी बोटीवर कारवाई केली. या प्रकरणी बोटीचा मालक व तांडेल अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हर्णे किनाऱ्याजवळ एक मासेमारी बोट या भागातील इतर बोटींना तस्करीचे डिझेल विक्री करत असल्याची माहिती समजताच, अधीक्षक अतुल व्ही. पोतदार यांच्या नेतृत्वाखाली सीमाशुल्क अधिकाऱ्यांचे पथक 21 एप्रिल 2026 च्या रात्री समुद्रात रवाना झाले. सुमारे 11 नॉटिकल मैल अंतरावर ‘रत्ना माऊली’ ही बोट शोधून काढण्यात आली. 21-22 एप्रिलच्या मध्यरात्री कारवाई करताना या बोटीला तसेच डिझेल खरेदी करणाऱ्या दुसऱ्या बोटीला अडवण्यात आले. संबंधित बोट दाभोळ जेट्टी येथे आणण्यात आली असून 22 एप्रिल रोजी सकाळी ती जप्त करण्यात आली. बोटीत साठवलेले डिझेलही जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी विशेष सरकारी वकील ॲड. शेखर डी. तोणपे यांनी दाखल केलेल्या अर्जावर दापोली न्यायालयाने 24 एप्रिल रोजी बोटीचा मालक व टंडेल यांच्या अटकेस मंजुरी दिली. त्यानुसार या बोटीचा मालक व तांडेल यांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात गेल्या दोन महिन्यांत ‘रत्ना माऊली’ बोटीमार्फत 300 टनांहून अधिक डिझेलची तस्करी करून हर्णे किनाऱ्यावर विक्री केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.