

दापोली : दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी जखमी अवस्थेत आढळलेल्या दुर्मीळ ‘बुबी’ पक्ष्याला स्थानिकांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक क्रेटमध्ये अडकून पडलेल्या या पक्ष्याला वेळेत मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या हा पक्षी वन विभागाच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे.
24 एप्रिल सकाळी 11.30 च्या सुमारास किनाऱ्यावर फिरणाऱ्या काही नागरिकांच्या नजरेस हा पक्षी पडला. तो उडू शकत नसल्याने आणि पंखाला दुखापत झाल्याने असहाय अवस्थेत पडून होता. नागरिकांनी तत्काळ पक्षीमित्र प्रीतम साठविलकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून वन विभागाला माहिती देण्यात आली.
वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पक्ष्याला सुरक्षित ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार सुरू केले. सध्या पक्ष्याची प्रकृती स्थिर असून पूर्ण बरे झाल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. दरम्यान, ‘बुबी’ ही समुद्री पक्ष्यांची प्रजाती असून ती प्रामुख्याने खोल समुद्रात विहार करत मासेमारी करते.
या पक्ष्याची उंचावरून पाण्यात झेप घेऊन मासे पकडण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. पांढरे शुभ्र शरीर, काळसर पंख, टोकदार चोच आणि जाळीसारखी पायांची रचना यामुळे हा पक्षी सहज ओळखता येतो. सहसा मानवी वर्दळ असलेल्या किनाऱ्यांवर हा पक्षी क्वचितच दिसतो. त्यामुळे हर्णे किनाऱ्यावर त्याचे आढळणे आणि त्याचवेळी त्याचे रेस्क्यू होणे ही दुर्मीळ घटना ठरली आहे. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या दुर्मिळ समुद्री पाहुण्याचे प्राण वाचले असून त्यांच्या या संवेदनशीलतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.