

गुहागर शहर : गेले दोन दिवस कोसळणार्या मुसळधार पावसाने तालुक्यातील तळवली परचुरी मार्गावरील आगरवाडीकडे जाणारा रस्ता खचल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथून अवजड वाहतूक करणे धोक्याचे बनले असून पर्यायी मार्ग नसल्याने परचुरी एस.टी. बस सेवा ठप्प झाली आहे.
दरम्यान, हा रस्ता खचल्याने पांगारी व परचुरीकडे जाणारी एस.टी. बससेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे येथील विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तळवली-परचुरी मार्गावरील श्री सोमनागेश्वर मंदिरापुढे हा रस्ता खचला आहे. मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी हा रस्ता खचला आहे, तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला भातशेती असल्याने मोठ्या वाहनांना येथून जाण्यासाठी कोणताच पर्याय नाही. केवळ छोटी वाहने वाहतूक करीत आहेत. दरम्यान तलाठी भिसे यांनी सदर ठिकाणी पाहणी केली असून आता आजुबाजूला भातशेती असल्याने प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी अशी मागणी आता प्रवासी वर्गातून होत आहे.