

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील वेदांत ज्वेलरी कंपनीमध्ये काम करणार्या 10 महिलांना सोमवारी बेकरीतील पेढ्यातून झालेल्या विषबाधाप्रकरणी अन्न व औषध विभागाने चौकशीस सुरुवात केली आहे. संबंधित बेकरीतील पेढ्याचा उर्वरित साठा तपासणीसाठी जप्त केला आहे. या पेढ्यांचा उत्पादक सातारा येथील असल्यामुळे पुढील आवश्यक कारवाईसाठी सातारा अधिकार्यांना कळविण्यात आल्याची माहिती अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त नितीन ढेरे यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.
पालपेणे रस्त्यालगत असलेल्या वेदांत कंपनीत दागिन्यांना खडे लावण्याचे काम करणार्या महिलेने श्रावण सोमवार उपवास असल्याने शृंगारतळी येथील बेकरीतून पेढ्याचा बॉक्स आणला. ते पेढे आपल्याबरोबरच काम करणार्या इतर महिलांना दिले. मात्र पेढे खालल्यानंतर 10 महिलांना उलटी व चक्कर येवू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर महिलांची प्रकृती स्थिर आहे. अन्न व औषध प्रशासनाची टिम घटनास्थळी दाखल होवून पेढ्याचा साठा जप्त केला आहे. पुरवठादार हा सातार्याचा असून त्याची चौकशी सुरू आहे. पुढील कारवाईसाठी सातारच्या आधिकार्यांना कळविण्यात आल्याचे अन्न,औषध अधिकारी मोहिते यांनी माहिती दिली.
सध्या श्रावण महिना सुरू असून सणासुदीचे दिवस आहेत. यादिवशी उपवासाबरोबरच गोडपदार्थांची मोठी खरेदी होत असते. सणासुदीच्या दिवसात भेसळ होण्याची शक्यता असते, जिल्ह्यात मिठाईसह दुग्धजन्य पदार्थांची तपासणी आवश्यक असल्याचा आवाज ‘पुढारी’ने वारंवार वृत्तपत्रातून उठवला आहे. मात्र याकडे अन्न व औषध विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले. अखेर गुहगर तालुक्यात पेढ्यामधून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
विषबाधा झालेल्यामध्ये संजना संजय गिरी (वय 30, रा. रामपूर), प्रतीक्षा मोहिते, वृषाली पवार, स्वप्नाली पवार, मधुरा घाणेकर, निकिता गमरे, पूजा मानके, सोनाली नाईक, विदिशा कदम, प्रिया मोहिते या महिलांचा समावेश होता. त्यांच्यावर योग्य ते उपचार झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.