

गुहागर : गुहागर समुद्रकिनारी समुद्रस्नानाचा आनंद घेत असताना खोल पाण्यात बुडण्याच्या अवस्थेत असणाऱ्या साताऱ्यातील दोन तरुण पर्यटकांना वाचवण्यात आले. समर्थ वॉटर स्पोर्टस्च्या कर्मचार्यांच्या तत्परतेमुळे दोघांचेही प्राण वाचले. ही घटना रविवारी सकाळी ८.३० वाजता घडली.
सिद्धांत पाटील, शुभांकर (दोघेही रा. सातारा) हे खालचापाट येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील समुद्रकिनारी स्नान करत असताना खोल समुद्रात गेले. दोघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याने किनार्यावरील मित्रांनी मदतीसाठी धावपळ सुरू केली.
यावेळी जीव रक्षक परदेश तांडेल यांनी तातडीने समर्थ वॉटर स्पोर्टस्चे मालक व नगरसेवक उमेश भोसले यांना कळवले. त्यांच्या सूचनेनुसार कर्मचारी मुजाहिद मिरकर व सफायद बागकर यांनी जेटस्कीच्या सहाय्याने समुद्रात धाव घेत दोन्ही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी नगरपंचायतीकडून तात्पुरती जबाबदारी दिलेले कर्मचारी आशिष सांगळे यांनीही बचावकार्याला मदत केली.
टेंडर संपल्याने सुरक्षाचा प्रश्न ऐरणीवर
गुहागर समुद्रकिनारी ६ किलोमीटर परिसरात पूर्वी पाच जीवरक्षक नियुक्त होते; मात्र त्यांचे टेंडर संपल्याने सध्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्हाळी हंगामात मोठ्या संख्येने पर्यटक येत असताना केवळ एका कर्मचाऱ्यावर जबाबदारी सोपवल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुहागर समु द्रकिनारी तातडीने जीवरक्षकांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.