Uday Samant : आरेवारेतील कारवाईवरून पालकमंत्र्यांनी काढली वनअधिकाऱ्यांची खरडपट्टी

संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे डीएफओ गिरिजा देसाईंना दिले आदेश
Uday Samant
Uday Samantfile photo
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : आरे-वारे समुद्रकिनारी स्थानिकांच्या स्टॉलवर वनविभागाने केलेल्या कारवाईवर पालकमंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिकांना पूर्वकल्पना न देता स्टॉल पाडल्याने संतप्त झालेल्या सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना जिल्हा वनाधिकारी गिरीजा देसाई यांना दूरध्वनीवरून दिल्या. तसेच, आपल्या मतदारसंघात कारवाई करण्यापूर्वी आपल्याला माहिती द्यावी, अशी सक्त ताकीदही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

आरे-वारे समुद्रकिनाऱ्याच्या रस्त्याच्या दुतर्फा स्थानिकांचे स्टॉल आहेत. दोन दिवसांपूर्वी वनविभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीच्या साहाय्याने या स्टॉलवर कारवाई केली. यात नव्या स्टॉलसह जुने स्टॉलही पाडण्यात आल्याने अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी काही स्टॉलधारकांनी पालकमंत्री सामंत यांची भेट घेऊन घेत वनविभागाच्या कारवाईबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून जाब विचारत कारवाईच्या पद्धतीवर संताप व्यक्त केला. संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाच्या सूचनाही त्यांनी दिल्या.किनाऱ्यांचा होणार पर्यटनदृष्ट्या विकासकोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘सिंधुरत्न’ योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख समुद्रकिनाऱ्यांचा विकास करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. आरे-वारे, भाट्ये, नेवरे ते गणपतीपुळे या किनाऱ्यांवर प्रत्येकी पाच ते सात कोटी रुपयांचे आकर्षक पर्यटन प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. स्थानिक व्यावसायिकांचा उदरनिर्वाह लक्षात घेऊन पात्र लाभार्थ्यांची पारदर्शक यादी तयार केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

समुद्रकिनाऱ्यांवरील अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. प्रांताधिकाऱ्यांना यासंदर्भात अधिकार देण्यात आले असून, विनापरवाना स्टॉल उभारले जाणे किंवा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची वेळ येणे, अशा प्रकरणांत जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा सामंत यांनी दिला. पर्यटनाला शिस्त लावताना स्थानिकांच्या रोजगाराच्या संधीही वाढवण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news