...तर भारत जगाला भारी पडेल : डॉ. उदय सामंत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती अभ्यासाचा रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांकडून गौरव
Chhatrapati Shivaji Maharaj war strategy
रत्नागिरी : युद्धनौकेची प्रतिमा ना. उदय सामंत यांना भेट देताना एनसीसीचे अधिकारी.
Published on
Updated on

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि त्यांच्या मावळ्यांचे मनोधैर्य हे प्रत्येकाच्या मनगटामध्ये असले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला तर हा देश सगळ्या जगाला भारी पडू शकतो. एनसीसीमध्ये गेलं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, तर एनसीसीमध्ये जे जे काय शिकवले जाते ते आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना सांगून त्यांच्यामध्ये देखील देशभक्ती निर्माण करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण स्वीकारावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

कुठलीही मुले अमली पदार्थाचे सेवन करणार नाहीत आणि अमली पदार्थाचे सेवन करायला न देणं हीच खर्‍या अर्थाने राष्ट्रभक्ती आहे. अशा पद्धतीचे वातावरण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी तयार करणे आवश्यक आहे. चित्रपट पाहून त्यामधील भूमिका आपण साकारण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. पण, ते काल्पनिक आहे, हेदेखील विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण, तसंच जर आपण वागायला लागलो तर आपले करिअर काय, हादेखील प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे, असे ना. सामंत म्हणाले. महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी भवनाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, डीआयजी डी. एन. उपाध्याय, कमांडर के. राजेशकुमार, शैलेश गुप्ता, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, प्रशांत चतुर, सतीश शेवडे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, सुमारे 42 कोटी रुपये खर्च करून प्रशस्त एनसीसी भवन हे रत्नागिरीमध्ये उभारले जात आहे. ज्यांच्यामध्ये सहनशीलता, चांगलं काहीतरी करण्याची उमेद आहे, अशी मंडळी एनसीसीमध्ये जातात. एनसीसीमध्ये देशभक्तीची भावनादेखील फार मोठ्या पद्धतीने वाढीला लागेल. आपण सगळ्यांनी बघितलं की आपल्या देशाने पाकिस्तानला कशी अद्दल घडविली. त्याविषयीची माहिती जगाला सांगणार्‍या दोन महिला भगिनी होत्या. एक सिंग आणि दुसरी सोफिया कुरेशी, हाच आदर्श आपल्यासाठी मोलाचा आहे. आजपर्यंत आपण असं म्हणत होतो की, महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतात. पण, महिला देश संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक पाऊल पुरुषांच्या पुढे आहेत, असेही ना. सामंत यावेळी म्हणाले.

समाजा-समाजांमध्ये, धर्मा-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण सगळ्यांनी मिळून अशा प्रवृत्तींना तिलांजली देण्याचे काम केले पाहिजे. त्याचा आदर्श सगळ्या मिलिटरी ऑफिसर्सकडून घेतला पाहिजे. असे सांगून पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एनसीसी शिकता आली पाहिजे. कॉलेज जीवनामध्ये जर खर्‍याअर्थाने देशभक्ती आपल्याला निर्माण करायची असेल, तर आपला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हेदेखील प्रशिक्षित असले पाहिजेत. भविष्यामध्ये एखादी तरी सोफिया कुरेशी, एखादी सिंग आपल्यामधून निर्माण झाली पाहिजे.

अमली पदार्थाच्या विळख्यामध्ये केवळ आपणच बरबाद होत नाही. तर आपल्या कुटुंबाला देखील बरबाद करतो. आपल्या शेजार्‍याला देखील बरबाद करतो आणि आपण सामाजिक स्तरावर समाजाला देखील बरबाद करतो. कुठेतरी ध्येय ठेवलं की, माझ्या आजूबाजूची मुलं कुठलीही अमली पदार्थाचे सेवन करणार नाहीत आणि अमली पदार्थाचं सेवन करायला न देणं हीच खर्‍या अर्थाने राष्ट्रभक्ती आहे. एनसीसी भवनाच्या माध्यमातून चारशे लोकांची राहण्याची व्यवस्था तर होईलच; परंतु 400 लोकांमध्ये रुजवलेला देशभक्तीचा विचार हा चार लाख लोकांपर्यंत नेण्याची जबाबदारी माझ्या रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारली पाहिजे. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती निर्माण केलीच पाहिजे. पण, एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवून जनजागृती करण्याचे काम केले पाहिजे. कमांडर के. राजेशकुमार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, एनसीसी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news