

रत्नागिरी : राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर योजना आणि निर्णयांचा धडाका लावला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच-उपसरपंचांना दिले जाणारे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पूर्वीसुद्धा सरपंचांच्या मानधनात वाढ केली होती; परंतु ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात गेली अनेक वर्षांपासून वाढ झालेली नसून त्यांची केवळ 200 रुपये बैठक भत्त्यावर बोळवण केली जात आहे.
सरपंच-उपसरपंचांवर मेहेरबान, मग आमच्यावरच अवकृपा का? असा सवाल ग्रामपंचायत सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे. शासन सरपंच व उपसरपंच यांच्याप्रमाणेच गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सदस्यदेखील कामकाज करत असतात. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानपूर्वक मानधन मिळायला पाहिजे. यासाठी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. परंतु त्याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना केवळ 200 रुपये बैठक भत्त्यावर समाधान मानावे लागत आहे. शासनाने सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले, त्याला कोणत्याही सदस्यांनी विरोध न करता या निर्णयाचे स्वागतच केले. परंतु शासनाने ग्रामपंचायत सदस्यांचा विचार करून मानधनात वाढ करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 पर्यंत आहे तेथील सरपंचाचे मानधन रु. 3000 वरुन रु. 6000 तर उपसरंपचाचे मानधन 1000 रुपयांवरुन 2000 रुपये करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 ते 8000 पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन रु. 4000 वरुन रु. 8000 तर उपसरपंचाचे मानधन 1500 वरुन रु. 3000 करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन 5000 रु. वरुन 10,000 रु. तर उपसरपंचाचे मानधन 2000 रुपये वरुन 4000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.