Ratnagiri News : राष्ट्रीय महामार्गालगतच ग्रा. पं.कडून टाकला जातोय कचरा!

वेरळ-भरणे दरम्‍यान जगबुडी पूल परिसरातील प्रकाराने संताप; सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
Ratnagiri News
राष्ट्रीय महामार्गालगतच ग्रा. पं.कडून टाकला जातोय कचरा!
Published on
Updated on

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेरळ आणि भरणे गावांच्या दरम्यान जगबुडी नदीवरील पुलाजवळ वेरळ ग्रामपंचायतीची कचरा घंटागाडी थेट महामार्गालगतच कचरा टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्य तसेच महामार्ग परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वेरळ ग्रामपंचायतीकडून परिसरातील कचरा संकलित करण्यासाठी वापरण्यात येणारी घंटागाडी जगबुडी नदीवरील पुलाजवळ महामार्गालगत आणण्यात आली होती. यावेळी घंटागाडीतून कचरा महामार्गाच्या बाजूला टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गालगतच कचरा टाकला जात असल्याने या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. महामार्गालगत कचरा साचल्याने दुर्गंधी, माशा-डासांचा प्रादुर्भाव तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने या परिसराच्या स्वच्छतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी उपस्थित कर्मचार्‍यांनी ओला व सुका कचरा एकत्रितच या ठिकाणी थेट आणून ओतल्याचा संतापजनक प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आणल्यानंतरदेखील हा प्रकार पुढे काही तास तसाच सुरू राहिला होता.

सार्वजनिक स्थानिक स्वराज्य संस्था अशा बेजबाबदारपणे वागत असतील तर या प्रकाराची राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग, आरोग्य विभाग तसेच तालुका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. महामार्गालगत कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जाणार का? असा सवालही उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news