

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-जिल्हा रुग्णालयातील विविध रिक्त पदे असून पहिल्या टप्प्यातील नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अशी एकूण 94 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून त्यासाठी जाहिरात ही प्रसिध्द झाली आहे. प्राध्यापक भरतीसाठी इच्छुकांना 27 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदाबाबत दै. पुढारीने वारंवार आवाज उठविला होता. अखेर पुढारीच्या वृत्तामुळे व पाठपुराव्याला यश आले आहे. रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-जिल्हा रुग्णालयात 271 पदे रिक्त असल्यामुळे इतर डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर ताण पडत होता. ही पदे भरण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली असून पहिल्या टप्प्यात प्राध्यापक भरती होणार आहे. प्राध्यापक 37, सहयोगी प्राध्यापक 22, सहायक प्राध्यापक 35 इतकी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणातील भूमीपुत्रांना रत्नागिरीतच रोजगार मिळणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिध्द झालेली असून इच्छुक उमेदवारांनी 27 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.