

देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग - गोळवली येथील महामार्ग काँक्रिटीकरण प्लांटच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनचालक या ठिकाणी घसरून पडत आहेत. यामुळे नागरिक यांनी बांधकाम विभाग व ठेकेदावर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
चिखलमय रस्त्याच्या स्थितीकडे संबंधित बांधकाम विभागाचे आणि महामार्ग प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी अनेक वेळा तक्रार करूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चिखलामुळे दोन चाकी आणि चार चाकी वाहने घसरून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, वाहतुकीला अडथळाही निर्माण झाला आहे.
स्थानिक जनतेने तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदारांचे लक्ष वेधण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी जर एखादा मोठा अपघात झाला, तर त्याला पूर्णतः बांधकाम विभाग जबाबदार असेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. प्रशासन आणि स्थानिक आमदारांनी त्वरित लक्ष घालावे, रस्त्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या विभागांनी त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या निषेधाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.