

रत्नागिरी : सोने, चांदीच्या दरात वाढ झाली असली तरी ज्वेलर्स दुकानांमधील गर्दी कमी झालेली नाही. सोन्याच्या 1 तोळ्याच्या दरात 1500 रुपयांनी, तर चांदीच्या 1 किलोच्या दरात 5 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील मागणीमुळे दर वाढ झाली असल्याचे रत्नागिरीतील अमेय ज्वेलर्सचे मालक अमेय वीरकर यांनी सांगितले.
सोन्याचा 1 तोळ्याचा दर 1 लाख 23 हजार 500 रुपये अधिक जीएसटी इतका झाला आहे. गेल्या चार दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा तोळ्याचा दर 1 लाख 13 हजार रुपयांवर पोहचला आहे. यामध्येही जीएसटी वेगळा आहे. चांदीचा 1 किलोचा दर 1 लाख 60 हजार रुपयांवर पोहचला आहे. गेल्या काही दिवसात चांदीच्या दरात 5 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली असली तरी ग्राहकांची सोने-चांदी खरेदीची ओढ कायम असल्याने ज्वेलर्स दुकानांमध्ये गर्दी असते असे अमेय ज्वेलर्सचे मालक वीरकर यांनी सांगितले.