

चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड येथे बंदुकीची गोळी थेट खिडकीच्या काचेतून स्वयंपाकघरात आल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशाल विजय पवार (वय 36, रा. पेठमाप-चिपळूण) व नितीन धोंडू होळकर (30, रा. कोंढे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शहरातील गोवळकोट रोड या ठिकाणी असलेल्या हायलाईफ या तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अशरफ तांबे यांची सदनिका आहे. 29 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या स्वयंपाकघराच्या खोलीमध्ये मोठा आवाज झाला. यावेळी त्यांना खिडकीची काच तोडून एक बंदुकीची गोळी स्वयंपाकघरात पडल्याचे दिसून आले. या प्रकरणी चिपळूण पोलिसांना माहिती देण्यात आली व अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर चिपळूण पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, ही बंदुकीची गोळी शिकारीच्या उद्देशाने मारल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांची चौकशी केली असता, विशाल पवार यांची गोवळकोट रोड येथे भातशेती आहे. त्या ठिकाणी डुकरांचा त्रास शेतीला मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे डुकरांच्या शिकारीसाठी त्याने नितीन होळकर याला बोलाविले होते. नितीन हा विनापरवाना बंदूक घेऊन त्या ठिकाणी आला व त्याने शिकारीच्या हेतूने गोळी झाडली. मात्र, हा नेम चुकून ही गोळी थेट अशरफ तांबे यांच्या सदनिकेमधील किचनच्या खिडकीची काच फोडून स्वयंपाकघरात घुसली आणि एकच खळबळ उडाली. पोलिस तपासानंतर चिपळूण पोलिसांनी बंदूक जप्त केली आहे तर दोन्ही आरोपींना येथील न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.