

वैभव पवार
गणपतीपुळे : जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेला गणपतीपुळे किनारा दिवाळी पर्यटन हंगाम दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दीने गजबजत असतो. यंदाही याच प्रकारे या ठिकाणी पर्यटकांनी गणपतीपुळ्याला मोठी पसंती दर्शवल्याने सुमारे दोन ते तीन लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यावेळी दिवाळीत भाविक तसेच पर्यटकांच्या वाढलेल्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जयगड पोलिस ठाण्याच्या वतीने जिल्हा पोलिस दलाकडे जादा पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती. त्यामध्ये सुमारे 30 पोलिस कर्मचार्यांनी संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जयगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची चोख कामगिरी बजावल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यातील भाविक व पर्यटकांच्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण गणपतीपुळे परिसरात ठिकठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. तसेच, विशेषत: गणपतीपुळे येथे येणार्या पर्यटकांच्या वाहनांची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि कुठलीही वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता रत्नागिरी येथील वाहतूक पोलिस कक्षाचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी कामगिरीसाठी नेमण्यात आले होते. यामुळेचे वाढलेल्या प्रचंड गर्दीतही गणपतीपुळे येथे वाहनांच्या पार्किंग बाबत कुठलाही मोठा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. त्यांनी अत्यंत नीटनेटकेपणाने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोठी मेहनत घेतल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, एकूणच गणपतीपुळे येथील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विशेषत:समुद्र चौपाटीवर दुर्घटना टाळण्यासाठी आणि खोल समुद्रात जाणार्या पर्यटकां वर विशेष लक्ष ठेवण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने सुमारे 30 पोलिस कर्मचार्यांनी विशेष कामगिरी बजावल्याची माहिती देण्यात आली आहे.
मागील चार-पाच दिवसांपूर्वी गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर समुद्रात बुडणार्या पर्यटकांची संख्या वाढू लागली होती. या पार्श्वभूमीवर जयगड पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. त्यामध्ये पुरुष व महिला पोलिस कर्मचार्यांनी विशेष गस्त घालून समुद्राच्या खोल जाणार्या पर्यटकांना पाण्याबाहेर काढणे आणि बुडणार्या पर्यटकांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यावर भर दिला.