Ganpatipule Beach : पालकमंत्र्यांच्या आदेशाने गणपतीपुळे बीच खुला

ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिकांकडून उदय सामंत यांचे आभार; सुरक्षेसह स्वच्छतेच्या सूचना
Ganpatipule Beach
गणपतीपुळे किनारा File Photo
Published on
Updated on

गणपतीपुळे : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेचा समुद्रकिनारा जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ३ सप्टेंबर रोजी अचानक बंद करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली होती. यानंतर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या आदेशाने शनिवारपासून (५ सप्टेंबर) गणपतीपुळे बीच पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

बीच बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांनी जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. शुक्रवारी (४ सप्टेंबर) रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण (भैया) सामंत व जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यावरील सद्यस्थितीची माहिती देत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीचे सहा जीव रक्षक दोन सत्रांत कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच जयगड पोलिस ठाण्यांतर्गत होमगार्डही तैनात असून, पर्यटकांना आवश्यक सूचना दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले.

वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला गणपतीपुळे बीच तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ग्रामपंचायतीने शनिवारपासून समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला केला. यासाठी माजी उपसरपंच मयूर केदार, माजी सरपंच महेश ठावरे, कल्पेश सुर्वे, रवी ठावरे, अविनाश माने, उमेश भणसारी, विश्वनाथ पालकर, बंड्या घाणेकर, मंगेश गोताड, किशोर गुरव आदी ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांनी पाठपुरावा केला.

स्वच्छता राखण्याच्या सूचना

बीच सुरू करताना स्वच्छता राखण्याच्या सूचनाही पालकमंत्री सामंत यांनी दिल्या. बीच पुन्हा सुरू केल्याबद्दल ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.

logo
Pudhari News
pudhari.news