

रत्नागिरी : मारुती मंदिर येथील ‘श्री रत्नागिरीचा राजा, आठवडा बाजारातील रत्नागिरीचा राजा तसेच टिळक आळी मंडळ अशा मानाच्या मंडळांची दुपारपासून जय्यत तयारी... वाद्यांच्या तालावर थिरकताना तरुणाई...विविध ढोल पथकांचा दणदणाट...गुलाल, गुलाबपुष्पांची उधळण...डौलाने फडकणारे भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषा...फटाक्यांची आतषबाजी...चिमुकले, तरुण, तरुणी, महिलांची मिरवणूक पाहण्यासाठी झालेली गर्दी...‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष... वाजत-गाजत श्री रत्नागिरीचा राजा, आठवडा बाजारातील रत्नागिरीचा राजा आणि टिळक आळीतील बाप्पा अशा मानाच्या तिन्ही सार्वजनिक मंडळांकडून रात्री उशिरापर्यंत शानदार मिरवणुका काढून मांडवी समुद्रात लाडक्या बाप्पाचे विसर्जन करून भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्जव गणेशभक्तांनी विसर्जनावेळी केली.
मागील दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील 36 हजारांहून अधिक घरगुती तर 61 सार्वजनिक मंडळांनी जल्लोषात, वाजत-गाजत मिरवणुका काढून गणरायास निरोप दिला. त्यानंतर रविवारी, 7 सप्टेंबर रोजी रत्नागिरी शहरातील श्री रत्नागिरीचा राजा, आठवडाबाजार येथील रत्नागिरीचा राजा आणि टिळक आळी येथील सार्वजनिक मंडळांच्या वतीने सायंकाळी 5 च्या सुमारास विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. मराठी, हिंदी गाण्यावर तरुणाई थिरकताना दिसत होती. मिरवणुकीत सहभागी विविध ढोल पथकांनी उत्कृष्ट असे ढोलवादन करीत उपस्थितांची मने जिंकली. काही तरुणींनी पारंपरिक साडी परिधान करून शानदार ढोल वाजवून उपस्थितांची वाहवा मिळवली.
आठवडा बाजारातील रत्नागिरीच्या राजाच्या मंडळानेही भव्य मिरवणुकीचे नियोजन केले होते. त्या ठिकाणी मोठी गर्दी पहावयास मिळाली. तरूणाई वाद्यांच्या तालावर थिरकली होती. फटाक्याची आतषबाजी, गुलाब पुष्पांची उधळण करीत शानदार मिरवणुक काढण्यात आली.
टिळक आळी मंडळाकडून डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्य, लेझिमचा खेळ खेळून जल्लोषात अशी मिरवणुक काढण्यात आली. ढोल-ताशांचा दणदणाट करून बहारदार असे लेझिम खेळून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. उपस्थितांनी टाळ्या वाजवून,‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’असा जयघोष करून दाद दिली.
श्री रत्नागिरी राजाच्या मिरवणुकीस मारूती मंदिरपासून सुरूवात झाली. माळ नाका, बसस्थानक, राम आळी, गोखले नाका, विठ्ठल मंदिरामार्गे मांडवी तर आठवडाबाजार येथील रत्नागिरी राजा या मंडळाच्या मिरवणुकीचा मार्ग आठवडाबाजार, राम आळी, गोखले नाका, मांडवी तर टिळक आळी मंडळाच्या गणेशमूर्तीचा काँग्रेस भवन रोडपासून मांडवी समुद्र किनार्यार्यंत असा तिन्ही मंडळाचा मिरवणुकीचा मार्ग होता. रविवारची ही विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी तरूण, तरूणी, महिला, चिमुकले तसेच ज्येष्ठांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. दुतर्फा रस्त्यावर गर्दीच गर्दी दिसून आली. मानाच्या तिन्ही मंडळाकडून रात्री उशिरापर्यंत मिरवणुका काढून लाडक्या गणरायास भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. रत्नागिरी शहरातील प्रमुख तीन सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुकीसाठी शहरातील पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.
श्री रत्नागिरीचा राजाच्या मिरवणुकीत एका ढोलपथकाने पारंपारिक वेशभूषेत भगवान शंकर, पार्वतीची वेशभूषा परिधान करून उत्कृष्ट असे ढोलवादन केले. यावेळी उपस्थितांनी त्यांची छबी आपल्या मोबाईलच्या कॅमेर्यातून टिपल्या.