

रत्नागिरी : इंधन संपणार या सोशल मिडीयावरील अफवेमुळे मागील दोन दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजीसाठी शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर रांगाच रांगा दिसून आल्या. काही ठिकाणी 200 रूपयाचे पेट्रोल घेण्याचे बंधनकारक करण्यात आले, तर काहीठिकाणी हवे तितके पेट्रोल देण्यात आले. दरम्यान, रविवारी कंपन्याकडून पेट्रोल लोडींग न झाल्यामुळे गर्दी झाली असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलची टंचाई नसल्याचे सांगण्यात आले.
देशात लॉकडाऊन लागणार आहे त्यामुळे इंधन संपणार अशी अफवा सोशल मीडियावर पसरत असल्यामुळे मागणीत अचानक वाढ झाली तसेच रविवारी कंपन्याकडून आवश्यक पुरवठा झाला नसल्यामुळे पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. कित्येकांना अर्धातास प्रतीक्षा केल्यानंतर पेट्रोल मिळाले होते. एकंदरीत गुरूवारी शहरासह विविध ठिकाणी पेट्रोलचे टँकर आलेले आहेत. त्यामुळे पेट्रोल पुरवठा सुरळीत होईल, असेही जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
शहरात पेट्रोल टँकर दाखल
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे शिर्के पेट्रोल पंपावर पेट्रोल टँकर आला असून 10 हजार लिटर पेट्रोल, 5 हजार लिटर स्पीड पेट्रोल, 5 हजार लिटर डिझेलचा पुरवठा झालेला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल विक्री सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे शहरातील रहाटाघर येथील लोकमान्य पेट्रोल पंपावर रात्री टँकर आला असल्याचे सांगण्यात आले.
सीएनजीसाठी चारचाकीची गर्दी
शहरासह हातखंबा येथील सीएनजी गॅस सेंटरवर चारचाकी वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. काही ठिकाणी विशेषता रात्रीच्या सुमारास वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत आहेत. काही ठिकाणी सीएनजी गॅस संपले असे बोर्ड लावण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला.