

खेड : लोटे औद्योगिक वसाहतीत लक्ष्मी ऑर्गेनिक केमिकल्सकडून निर्मिती करण्यात येत असलेल्या ‘पीएफएएस’ या अत्यंत घातक ‘फॉरेव्हर केमिकल’चा मुद्दा राज्यसभा खासदार तथा राज्यसभेचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी चालू अधिवेशनात जोरकसपणे मांडला.
संदर्भात देशात अद्याप कोणतीही ठोस धोरणात्मक निश्चिती नसताना अशा केमिकल्सचे उत्पादन करणे कोणाच्याही अधिकारात येत नाही, तसेच हे रसायन मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने त्याची निर्मिती तत्काळ थांबवण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली. ही रसायने पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहणारी असल्याने त्यांना ‘फॉरेव्हर केमिकल’ म्हटले जाते. या रसायनांमुळे कर्करोग, हार्मोनल बिघाड, प्रतिकारशक्ती कमी होणे, पाण्याचे व जमिनीचे प्रदूषण यांसारखे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञ व आरोग्य अभ्यासकांनी यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे या रसायनांच्या उत्पादन, वापर व विल्हेवाटीबाबत कडक नियमावली असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्पादनाला विरोध करण्यासाठी पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून गावभेटी, जनजागृती दौरे व आंदोलन सुरू होते. या स्थानिक पातळीवरील आवाजाला आज थेट राज्यसभेत व्यासपीठ मिळाले, याबद्दल कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आपण गावागावांत जाऊन मांडलेला मुद्दा संसदेत पोहोचला, हे आमच्या संघर्षाचे फलित आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी सुरुवातीपासूनच या विषयाकडे लक्ष वेधले होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा प्रश्न व्यापक पातळीवर पोहोचला, असे सांगत उत्पादन बंद करण्याची मागणी करणाऱ्या पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्त्यांनी हुसेन दलवाई यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. बाबत केंद्र सरकारने तातडीने स्पष्ट धोरण जाहीर करावे, उत्पादनावर बंदी किंवा कठोर निर्बंध घालावेत आणि पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे