Ratnagiri News : कोरड्या विहिरीत पडलेल्या 5 गव्यांची वन विभागाकडून सुखरूप सुटका

दोन मोठे गवे व तीन पिल्लांचा समावेश; ग्रामस्थांचेही रेस्क्यूमध्ये सहकार्य
Ratnagiri News
कोरड्या विहिरीत पडलेल्या 5 गव्यांची वन विभागाकडून सुखरूप सुटका
Published on
Updated on

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील मौजे लोवले (जि. रत्नागिरी) येथे कोरड्या विहिरीत पडलेल्या पाच रानगव्यांना वन विभागाने तत्पर कारवाई करत सुरक्षित बाहेर काढले. ही घटना 11 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा घडली. लोवले येथील संतोष प्रदीप खेडेकर यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पाच गवे पडल्याची माहिती कृषी सहायक समीर दोरखडे यांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच संगमेश्वर (देवरूख) परिमंडळ वन अधिकारी व त्यांचे सहकारी आवश्यक साहित्य घेऊन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

ही विहीर सुमारे 15 ते 20 फूट खोल व अंदाजे 15 फूट व्यासाची असून त्यात पाणी नव्हते. बॅटरीच्या उजेडात पाहणी केली असता दोन पूर्ण वाढ झालेले मोठे गवे व तीन लहान पिल्ले असे एकूण पाच रानगवे विहिरीत अडकलेले आढळले. विहिरीची उंची अधिक असल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य होत नव्हते. परिस्थितीचा आढावा घेत वनविभागाने जेसीबीच्या सहाय्याने विहिरीच्या एका बाजूने माती काढून उताराचा मार्ग (रॅम्प) तयार केला. तयार करण्यात आलेल्या नैसर्गिक मार्गाचा उपयोग करून सर्व पाच रानगवे रात्री सुमारे 1.30 वाजता सुरक्षितरित्या विहिरीबाहेर पडले.

या रेस्क्यूदरम्यान कोणत्याही रानगव्याला दुखापत झाली नाही. बाहेर आल्यानंतर एक मोठा नर, एक मादी आणि त्यांची तीन पिल्ले जंगलाच्या दिशेने सुरक्षित निघून गेली. हे बचावकार्य रत्नागिरी (चिपळूण) विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. वनपाल सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडुकर (फुणगूस), सूरज तेली (आरवली) आणि सहयोग कराडे (साखरपा) यांनी प्रत्यक्ष रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनीही सहकार्य केले. दरम्यान, अशाप्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास वन विभागाच्या टोल-फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 वर तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news