

राजापूर ः राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबईच्या भरारी पथकाने मुंबई गोवा महामार्गावर राजापूर बस स्थानकासमोर मोठी कारवाई करताना एका आयशर टेम्पो मधील सुमारे 80 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास राजापूर मतदारसंघातील स्थिर सर्वेक्षण पथकाने अणुस्कुरा घाटात दहा लाख रुपये किमतीच्या इनोव्हा गाडीसह सुमारे 27 हजार 640 किमतीची गोवा बनावटीची विदेशी दारू पकडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरीफ सलीम शेख याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ )(ई )नुसार गुन्हा दाखल केला आहे.
राजापूर विधानसभा मतदार संघातील नियुक्ती करण्यात आलेले स्थिर सर्वेक्षण पथक बुधवारी अणुस्कुरा घाटात आपल्या ड्युटीवर कार्यरत होते. त्यावेळी त्या पथकाचे प्रमुख रामेश्वर दत्तू शेट्ये, राजापूर पोलिस उपनिरीक्षक एम. शेख, रायपाटण पोलिस दूरक्षेत्रचे अंमलदार के. आर. तळेकर, त्यांचे पोलीस कर्मचारी आर. बी. पाटील, बी. आय. कोळी, स्वप्निल घाडगे,फोटोग्राफर प्रसाद दादेश पाटील आदी उपस्थित होते. सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान सिल्वर रंगाची टोयोटो कंपनीची इनोव्हा गाडी क्र. एम. एच. 06, बी. एम. 2176 पाचल कडून अणूस्कुराकडे चालली होती. सदर गाडी अणुस्कुरा घाटात वर्दीवर असलेल्या भरारी पथकाने थांबविली आणि तिची तपासणी केली असता, त्या गाडीच्या पाठीमागील डिकीमध्ये एका पुठ्ठ्याच्या बॉक्स मध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या तीन बाटल्या व दोन बिअरच्या बाटल्या असा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला सुमारे 27 हजार 640 किमतीचा तो मुद्देमाल आणि दहा लाख रुपये किमतीची टोयोटो कंपनीची इनोव्हा गाडी पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी इनोव्हा चालक आरिफ सलीम शेख, वय 40 याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.