Ratnagiri News : प्रतीक्षा कायम; उड्डाणपूल अद्याप अपूर्ण

महामार्गावरील अपूर्ण भरावाचा परिणाम; काँक्रिटीकरणाचे काम नव्वद टक्के पूर्ण
Ratnagiri News
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणमधील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या काँक्रिटीकरणाचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे.
Published on
Updated on

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठा उड्डाणपूल चिपळूण शहरात उभारला जात आहे. पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असताना केवळ भराव अपूर्ण राहिल्याने गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीस खुला होणार नाही, हे स्पष्ट होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती असणार्‍या चिपळूणमध्ये बहादूरशेख चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. या पुलावरील सर्व गर्डर चढवून पूर्ण झाले असून आता पुलावरील काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्य म्हणजे, बहादूरशेख चौकातील सर्व गर्डर चढवण्यात आले आहेत व त्या ठिकाणी आता स्लॅबचे काम सुरू करण्यात आले आहे. बहुतांश स्लॅबचे काम पूर्ण झाले असून केवळ रावतळे ते बहादूरशेख चौक या दरम्यान अपूर्ण असलेला स्लॅब टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संबंधित ठेकेदार कंपनीने हे काम मार्गी लावण्यासाठी जोरदार तयारी केली असून दिवस-रात्र काम सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्व हा पूल वाहतुकीस खुला होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, प्रांत कार्यालयासमोरील भरावाचे काम अपूर्ण राहिल्याने पूल पूर्ण होण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय या दरम्यान सुमारे २० फूट उंचीचा मातीचा भराव करावा लागणार आहे. सद्यस्थितीत पाच फुटांचा भराव पूर्ण झाला असून उर्वरित भरावाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीस खुला होणार नाही अशीच चिन्हे आहेत. अजूनही काँक्रीट केलेल्या पुलावर शेवटचा कोट करावा लागणार आहे. काँक्रीटनंतर २१ दिवसांचा कालावधी प्युरिंगसाठी द्यावा लागतो. त्यानंतर त्याच्यावरील कोट देता येतो आणि त्यानंतर उर्वरित कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी चिपळुणातील उड्डाण पूल वाहतुकीस खुला होणार नाही हे स्पष्ट आहे. परिणामी, नोव्हेंबर-डिसेंबरच्या कालावधीत हा पूल वाहतुकीस सुरू करता येतो का या बाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे.

बहादूरशेख चौकामध्ये उड्डाण पुलाच्या काँक्रिटीकरणाचे काम जोरदारपणे सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच चिपळूणहून कराडकडे जाणारी वाहतूक चौकातून न जाता पुढच्या बाजूने पुलाखालून वळवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news