

रत्नागिरी : राज्य सरकारने फूल उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, लवकरच राज्यात प्लास्टीक व कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येणार आहे. अलीकडच्या काळात विविध समारंभ, मंदिरे, मंगल कार्यालये, उत्सव आदीठिकाणी प्लास्टीक फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्यामुळे नैसर्गिक फुलांची मागणी घटली होती. परिणामी फुल उत्पादक शेतकर्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. यामुळे शेतकरी पुन्हा फुलशेती जोमाने करू लागणार आहे.
प्लास्टीक फुलांवरील बंदीमुळे आता फूल उत्पादनाला गती मिळण्याची आशा आहे. प्लास्टीकबंदीचा निर्णय या फूल उत्पादकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फुलशेतीकडे शेतकरी वळला आहे. मोठ्या प्रमाणात मोगरा व झेंडू लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुलाबाची लागवडदेखील झाली आहे.
सुगंधी सोनचाफ्याचे उत्पादनदेखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पावसाळ्यानंतर येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडू लागवड करतात. मात्र फुलांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. मात्र राज्य सरकारच्या प्लास्टीक फुलांवरील बंदीमुळे फुल उत्पादन घेणार्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर फुलांचे भाव स्थिर राहण्यात मदतदेखील होणार असल्याने शेतकर्यांना आर्थिक फायदा होणार आहे. फुलशेतीत शेतकर्यांना योग्य आणि स्थिर राहणार असल्याने तालुक्यातील फुलशेती वाढणार वाढणार आहे. फुल उत्पादक शेतकर्यांसह फूल सजावट करणारे डेकोरेटर्स, हार तयार करणारे, फुलांची वाहतूक करणारे व्यापारी अशा अनेक व्यावसायिकांना या बंदीचा फायदा होणार आहे. नैसर्गिक फुलांवर आधारित संपूर्ण साखळी पुन्हा सशक्त होणार आहे. यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील. शिवाय प्लास्टीकमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान थांबणार आहे.
प्लास्टीक फुलांच्या वापरामुळे शेतीमधून आलेल्या फुलांची विक्री कमी होत चालली होती. गुलाब, झेंडू, शेवंती, मोगरा यांसारख्या पारंपरिक फुलांची बाजारपेठ कमी होत गेली. प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यात आल्यास बाजारात नैसर्गिक फुलांची मागणी पुन्हा वाढेल, असा विश्वास शेतकर्यांनी व्यक्त केरला आहे.