

मालवण : 'एलईडी मासेमारी बंद झाली पाहिजे... एलईडी बोट धारकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो... मच्छीमारांना सवलतीच्या दराने डिझेल मिळायला हवे... एलईडी मासेमारी बंद करा अन्यथा खुर्ची खाली करा... समुद्र आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा', अशा विविध घोषणा देत ठाकरे शिवसेनेच्या वतीने एलईडी मासेमारी आणि डिझेल दरवाढी विरोधात शुक्रवारी शहरातून मोर्चा काढण्यात आला.
माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांना निवेदन सादर करून एलईडीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज शहरातील भरड येथून मत्स्यव्यवसाय कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडे आल्यानंतर जिल्ह्यातून आलेल्या मच्छीमार प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एलईडी मासेमारीमुळे समुद्रातील मासळी संपत चालली असून पारंपरिक मच्छीमार देशोधडीला लागला आहे. आता केवळ आश्वासनांनी आमचे पोट भरणार नाही. जोपर्यंत एलईडी मासेमारी कायमस्वरूपी बंद करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही आणि जप्त केलेली साधने परत न करण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा सिंधुदुर्गातील मच्छीमारांनी घेतला. ठाकरे शिवसेनेच्या वतीने आयोजित या मोर्चात वेंगुर्ले, देवगड, आचरा आणि मालवणमधील शेकडो मच्छीमार सहभागी झाले होते.