

चिपळूण : शिरगाव येथे कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा उभारण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बंधाऱ्याच्या प्राथमिक सर्वेक्षणासाठी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, १९ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि विंधन विवरे (बोअरिंग) घेण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे शिरगावसह परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
आ. शेखर निकम यांनी या बंधाऱ्यासाठी वर्षभरापासून सातत्याने प्रयत्न केले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची मंत्रालय स्तरावर भेट घेऊन त्यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, बंधारा उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
या बंधाऱ्याच्या उभारणीपूर्वी आवश्यक असलेले प्राथमिक सर्वेक्षण, तसेच विंधन विवरे घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे उपअभियंता विपुल खोत व राम वाजे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्वेक्षणाच्या कामाची पाहणी केली तसेच उपस्थितांशी प्रकल्पासंदर्भात चर्चा केली. यावेळी सूरज शिंदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नीलेश शिंदे, प्रगतशील शेतकरी विनायक शिंदे, उद्योजक प्रकाश सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते संतोष नाचरे उपस्थित होते.