

रत्नागिरी : ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ या संघटनेने देशात आणि राज्यात कार्यरत असलेल्या ऑनलाइन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये किरकोळ तसेच घाऊक औषध विक्रेते सहभागी होणार असल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. व्यापक जनहित लक्षात घेऊन नियोजित बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून वैयक्तिक स्तरावरही विक्रेत्यांशी संपर्क साधला जात आहे. बंदच्या काळात रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही औषध दुकाने सुरू ठेवण्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून त्यांनीही यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील ‘वेलनेस फॉरेव्हर’ आणि ‘मेडप्लस’ ही औषध दुकाने बंदच्या काळातही पूर्णवेळ सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक औषधे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नागरिकांसाठी पुढील संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सहाय्यक आयुक्त (औषधे) शशिकांत यादव (9657627924), औषध निरीक्षक सो. प्र. वाढे (7219581248) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.