

रत्नागिरी : तालुक्यातील उमरे येथील एका प्रौढाला बदनामीची भीती दाखवून तब्बल 17 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामचंद्र चिंतामणी केळकर (वय 52, रा. उमरे, ता. रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सुरैय्या हकीम, हुसैन नाईक, अंजर हकीम आणि अरफान हकीम (सर्व रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै 2025 रोजी तक्रारदार रामचंद्र केळकर हे आपल्या भावाला भेटण्यासाठी शहरातील एका रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांना सुरैय्या हकीम ही महिला रडत असल्याचे दिसले. चौकशी केल्यानंतर तिने आपल्या मुलाचे ऑपरेशन झाले असून रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर केळकर यांनी तिला आपला मोबाईल क्रमांक देत मदतीचे आश्वासन दिले.
दुपारी सुरैय्या हिने केळकर यांना फोन करून आर्थिक मदतीची विचारणा केली. त्यानुसार मारुती मंदिर परिसरात भेट झाल्यानंतर केळकर यांनी तिला 1,500 रुपये दिले. त्यानंतर आणखी पैशांची गरज असल्याचे सांगितल्याने त्यांनी तिच्या गुगल पे क्रमांकावर 500 रुपये पाठविले. दुसऱ्याच दिवशी, 23 जुलै 2025 रोजी, सुरैय्याच्या मोबाईलवरून एका पुरुषाने केळकर यांना फोन करून, "तुमचे आणि सुरैय्याचे संभाषण आम्ही रेकॉर्ड केले आहे. बदनामी टाळायची असेल तर 10 हजार रुपये द्या," अशी धमकी दिली. बदनामीच्या भीतीने केळकर यांनी संबंधिताने सांगितलेल्या गुगल पे क्रमांकावर 10 हजार रुपये पाठविले.
यानंतर वारंवार फोन करून संभाषणाची ध्वनिमुद्रिका नातेवाईक व मित्रपरिवाराला ऐकविण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या केळकर यांनी 22 जुलै 2025 ते 19 मे 2026 या कालावधीत विविध व्यवहारांद्वारे एकूण 17 लाख 9 हजार 494 रुपये संबंधितांना पाठविल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर केळकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुरैय्या हकीमसह चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5), 308(2) आणि 308(5) अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच सर्व संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.