Ratnagiri News : अतिक्रमण हटाव मोहीम जोरात

रत्नागिरी नगरपरिषदेची चर्मालय ते कोकणनगर दरम्‍यान कारवाई
Ratnagiri News
अतिक्रमण हटाव मोहीम
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेने बुधवारी मोठी कारवाई करत शहरातील चर्मालय ते कोकणनगर दरम्यान अनधिकृत बांधकाम हटविण्‍याच्‍या मोहिमेला सुरुवात केली. गुरुवारीही ही मोहीम सुरु राहणार आहे. यावेळी ८० बांधकामांवर हातोडा पडणार असून, पहिल्‍याच दिवशी ३५ हून अधिक अनधिकृत बांधकामे हटवण्‍यात आली.

चर्मालय ते कोकणनगर या वर्दळीच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत पक्क्या बांधकामामुळे रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या अडचणी येत होत्या. तसेच, शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे ११ केव्हीची भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनी टाकण्याचे कामही याच अतिक्रमणांमुळे अनेक दिवसांपासून खोळंबले आहे. ही धडक मोहीम काही दिवसांपूर्वीच राबवण्यात येणार होती. मात्र मागील वेळी सणासुदीचे दिवस पाहता प्रशासनाने ही कारवाई तात्पुरती पुढे ढकलली होती. त्यावेळी संबंधित अनधिकृत दुकानदारांनी आपली बांधकामे व दुकाने स्वतःहून हटवण्यासाठी प्रशासनाकडे मुदत मागून घेतली होती. प्रशासनाने त्यांना मुदत देऊन महिना उलटला तरी अतिक्रमणे 'जैसे थे'च होती. व्यावसायिकांनी स्वतःहून दुकाने न हटवल्याने अखेर प्रशासनाला कडक पावले उचलावी लागली.

बुधवारी सकाळीच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी जेसीबी मशीन आणि आवश्यक त्या फौजफाट्यासह चर्मालय-कोकणनगर परिसरात दाखल झाले. कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट कारवाईला सुरुवात झाल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची मोठी धांदल उडाली. या धडक कारवाईमुळे आता ११ केव्ही भूमिगत विद्युत वाहिनीचे प्रलंबित काम गतीने पूर्ण होण्यास मदत होणार असून, विमानतळाकडे जाणार्‍या रस्‍त्‍याचे रुंदीकरणाचा मार्गही त्‍यामुळे मोकळा होणार आहे.

मुख्‍याधिकारी वैभव गारवे यांच्‍या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद अभियंता यतिराज जाधव, आनंद थोरात, विजय कदम, अंकुश कदम, सार्वजनिक बांधकामचे अभियंता गराटे यांच्‍यासह नगरपालिकेच्‍या बांधकाम विभागाचे दहा कर्मचारी कारवाईच्‍या ठिकाणी कार्यरत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news