

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील कामगार शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिपळूण शहरातील खेंड येथील युनिटी बिल्डिंगमधील राहत्या खोलीत 63 वर्षीय नारायण सी. एम. (मूळ रहिवासी कन्नूर, केरळ) या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 22 सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली.
नारायण हे गेली 25 ते 30 वर्षे एका परप्रांतीय व्यावसायिकाच्या मालकीच्या बेकरी कारखान्यात कार्यरत होता. या कारखान्यातील अनेक कामगार तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. खर्चासाठी उचल घेऊन बाकीची रक्कम वर्षातून एकदा किंवा तातडीच्या वेळीच दिली जाते; मात्र हिशोब करताना वारंवार रक्कम कापून पगार दिला जातो, अशा तक्रारी सहकार्यांनी केल्या आहेत. या कारखान्याच्या शहरात आणि जिल्ह्यात बेकरी, मिठाई, नमकीन व विविध खाद्यपदार्थ विक्रीची मोठी दुकाने आहेत. यापूर्वीही खराब गुणवत्तेबाबत तक्रारी झाल्या असून त्या प्रकरणांना पैशाच्या जोरावर दडपण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह विच्छेदनानंतर मूळगावी पाठवण्यात आला. यामुळे या घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. स्थानिक कामगारांनी या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन न्याय मिळावा अशी मागणी केली आहे, अन्यथा मालकांच्या शोषणामुळे आणखी कामगार आत्महत्येस प्रवृत्त होतील, असा इशारा देण्यात आला आहे.
नारायण यांना गावी जाण्यासाठी हिशोब करून पगार हवा होता; मात्र मालकांनी तो देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. कामगारांचे म्हणणे आहे की, या कारखान्याच्या मालकांचे वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांशी आर्थिक संबंध असल्याने कोणताही कायदेशीर कारवाईचा धोका पत्करला जात नाही.