Ratnagiri Crime : वृद्धेचा खून करून दागिन्यांची चोरी;बारा तासांतच आवळल्‍या मुसक्या!

रत्‍नागिरी पोलिसांकडून खून व चोरीचा अवघ्या १२ तासांत पर्दाफाश; लांजा-वेरवली-रामगावात दिवसाढवळ्या घडली होती घटना
Crime
Crime
Published on: 
Updated on: 

लांजा : वयोवृद्ध महिला घरात एकटीच असल्याचा फायदा घेत चोरट्याने खून करून तिच्या अंगावरील दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १९) तालुक्यातील वेरवली-रामगाव येथे घडली होती. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. दिवसाढवळ्या घडलेल्या चोरी आणि खुन्याचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असतानाच, १२ तासांमध्‍ये घटनेची तपासचक्रे जलदगतीने फिरवून खुन्याच्या मुसक्या आवळल्याने रत्नागिरी पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

वैशाली विलास हेगिष्ट्ये (वय ७५, रा. रामगाव लाडवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली हेगिष्ट्ये व तिची मुलगी पल्लवी विलास हेगिष्ट्ये या दोघीच घरी राहत होत्या. दसरा झाल्यानंतर या माय-लेकी मुंबई येथे जाणार होत्या. पल्लवी ही सोमवारी सकाळी १०.३५ वाजण्याच्या दरम्यान घरापासून १ कि.मी.वर असलेल्या शेजारील वेरवली खुर्द या गावात दूध आणण्यासाठी गेली होती. ती सकाळी ११.३५ दरम्यान आपल्या घरी परतली असता, आई वैशाली या घराच्या खोलीमध्ये निपचित पडलेल्या अवस्थेत आढळल्या. तसेच त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या गायब असल्याचे निदर्शनास आले. आईला पाहून घाबरलेल्या पल्लवीने या घटनेची माहिती रामगावचे पोलिस पाटील सागर करळकर यांना दिली. पोलिस पाटील करळकर यांनी लांजा पोलिसांना माहिती दिली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली. यावेळी वैशाली हेगिष्ट्ये यांचा घरामध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांना १२ तासांच्या आतच घटनेचे धागेदोरे हाती लागले. घटनास्थळापासून अवघ्या दीड कि.मी.वर अंतरावर राहणारा प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा) याच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्यावर संशयाची सुई वळवली. त्याची कसून चौकशी केली असता, कर्जबाजारीमुळे आपण हा खून करून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली त्याने दिली. ही धडाकेबाज कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि लांजा व राजापूर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी वेगाने संयुक्तरित्या केल्याने लांजा तालुक्यातून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news