Ratnagiri Fraud| पोलिस असल्याचे भासवून वृद्धेची ६० लाखांची फसवणूक

लांजातील घटनेप्रकरणी रत्नागिरीत गुन्हा दाखल
Online fraud
ऑनलाईन फसवणूक
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : पोलिस अधिकारी असल्याचे भासवून लांजा येथील एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल ६० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्‍याच्‍या कालावधीत घडली.

सुशांत पिसे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्याविरोधात शेवरवाडी (ता. लांजा) येथील सिनिअर कॉलेजजवळ राहणाऱ्या ७८ वर्षीय महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, संशयित आरोपी सुशांत पिसे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याने फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल केला. पोलिस गणवेश परिधान करून त्‍याने आपण नाशिक येथील पंचवटी पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवले. तुमच्या आधारकार्डचा वापर करून मुंबईतील कॅनरा बँकेत एक खाते उघडण्यात आले आहे. या खात्यामध्ये अब्दुल रहमान नावाचा आरोपी वेगवेगळ्या संघटनांकडून पैसे गोळा करून पाठवत आहे आणि त्याचे १० टक्के कमिशन तुम्हाला मिळत असल्याचे तपासात समोर आले आहे, असे आरोपीने महिलेला सांगितले.

यानंतर आरोपीने वृद्ध महिलेला अटक करण्याची आणि समाजात बदनामी करण्याची भीती घातली. या धमकीला घाबरून फिर्यादी महिलेने आपल्या एसबीआय बँक खात्यामधून आरटीजीएसद्वारे 'पुनित ट्रेडर्स'च्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पैसे पाठवले. अशाप्रकारे आरोपीने महिलेकडून तब्बल ६० लाख रुपये उकळून तिची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी रत्नागिरी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.