

रत्नागिरी : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप झाले असून, त्या गणवेशाचा दर्जा तपासणीचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाची तपासणी करण्यासाठी टीमची नेमणूक करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली. तसेच पहिल्याच दिवशी सर्व विभागातील कामांचा आढावा लोहार यांनी घेतला आहे. दिलेली कामे वेळेत पूर्ण करा, कामे प्रलंबित ठेवू नका, बैठकीस गैरहजर असणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना नोटीसा काढा असे आदेशही लोहार यांनी बैठकीत दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी पद रिक्त झाले होते. त्यापदावर शिक्षणाधिकारी म्हणून किरण लोहार यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला असून पहिल्याच दिवशी ते ॲक्शन मोडवर आले आहेत. शिक्षण विभागात सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला असून त्या गणवेशाचा दर्जा तपासणीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुख करणार होते. मात्र अद्याप शाळेतील विद्यार्थ्यांची गणवेश तपासणी झालेली नाही. याविषयी लोहार यांनी गंभीर दखल घेतली असून परिपत्रकानुसार तातडीने टीमची नेमणूक करा, गणवेश तपासणीचे आदेश दिले आहेत. गणवेशाचा दर्जा निकृष्ट असल्यास कारवाई होणार आहे.
दुसऱ्या गणवेशासाठी निधी का आला नाही याची माहिती घेतली जाईल. तातडीने निधी आल्यानंतर शाळांना वितरीत होईल व दुसऱ्या गणवेशाचा प्रश्न मार्गी लागेल असेही लोहार यांनी सांगितले. नियुक्तीनंतर लोहार यांनी साखरपा येथील दोन शाळांना भेटी दिल्या. तेथील शाळांची पाहणी केली. तसेच विविध सूचनाही दिल्या आहेत. साखरपा येथील शाळांनी शिष्यवृत्तीचे चांगले काम केल्याचे लोहार यांनी सांगितले.