

चिपळूण शहर : शाळेच्या पहिल्या दिवशी कुठे विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत होते, कुठे पुष्पगुच्छ दिले जातात, काही ठिक़ाणी औक्षणही केले जाते. मात्र चिपळूण शहरातील मध्यवर्ती असणार्या एका शाळेत चक्क विद्यार्थिनींना पहिल्याच दिवशी स्वागताऐवजी अवजड कामे करावी लागली. शहरातील बापट आळीतील कन्याशाळेतील मुलींनी शाळेच्या पहिल्याच दिवशी कष्टप्रद आणि धोकादायक कामे केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पालक व शिक्षणप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या शाळेच्या वर्गखोल्यांच्या डागडुजीचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते. हे काम पूर्ण होऊनही संबंधित ठेकेदाराने त्याठिकाणी अडगळ व अस्वच्छता ठेवली होती. यासंदर्भात तेथील शिक्षक सातत्याने संबंधित ठेकेदाराला साफसफाई करण्यास व सामानाची हलवाहलव करण्यास विनंती करीत होते. मात्र शाळेचा पहिला दिवस उजाडला तरी ‘त्या’ ठेकेदाराने शिक्षकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. अखेर शाळेचा पहिला दिवस उजाडलाच. येथील शिक्षकांनी शेवटी स्वतः अंगमेहनत करून त्या वर्गखोल्यांमधील ठेवलेली कौले व अन्य साहित्य अन्यत्र हलविले. यानंतर याठिकाणी असणारी अवजड लोखंडी कपाटे चक्क विद्यार्थ्यांना उचलावी लागली. पहिल्या दिवशी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत होण्याऐवजी त्यांना अंगमेहनतीचे काम करावे लागले. ठेकेदाराच्या अनागोंदी कारभाराचा फटका या विद्यार्थिनींना बसला.
ठेकेदाराचा मुजोरपणा...
चिपळूण शहरातील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेमध्ये १९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर तीन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ही कष्टप्रद आणि मेहनतीची कामे करावी लागली. यासंदर्भात तेथील शिक्षकांना विचारले असता, आम्ही वारंवार याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना केली. या वर्गखोल्या साफ करून द्या, त्यातील अवजड सामान काढा, कौले उचला, असे सांगितले. मात्र अखेरपर्यंत ठेकेदाराने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. अखेर आम्हाला हे काम करावे लागले, अशी माहिती येथील शिक्षक़ांनी दिली.