

रत्नागिरी : शिक्षण केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता ते आनंददायी, भाकरी देणारे आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण करणारे असावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.
‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी शिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळांमधील सुविधांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
शाळा दुरुस्तीचा निधी थेट खात्यावरशाळांच्या किरकोळ दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी शासकीय प्रक्रियेत वेळ जाऊ नये, यासाठी दुरुस्तीचा निधी थेट मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या (एसएमसी) संयुक्त खात्यावर वर्ग करण्याचा शासन निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची घोषणा भुसे यांनी केली. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे हा शासनाचा हेतू नसून, दर्जेदार शिक्षण देऊन त्यांची पटसंख्या वाढवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाशिममधील साखरे गावातील जिल्हा परिषद शाळेचे उदाहरण देत सरकारी व मराठी शाळांमध्येही उत्तम वातावरण निर्माण करता येते, असे त्यांनी सांगितले. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाल कमी होत असल्याने दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायतीचा ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनी दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सीएसआरमधून हायटेक ग्रंथालये
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी शाळांचा कायापालट करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील जुन्या अथवा वापरात नसलेल्या खोल्यांचे सीएसआर निधीतून सुसज्ज ग्रंथालये व एआय तंत्रज्ञानयुक्त अध्ययन केंद्रांमध्ये रूपांतर करण्यासाठी ‘प्रकल्प भविष्य’ राबवण्यात येणार आहे. शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, संरक्षक भिंत, सीसीटीव्ही आणि क्रीडांगणांसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या योगदानामुळेच शाळांची गुणवत्ता उंचावू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
१५० विद्यार्थ्यांचा इस्रो, ६० जणांचा नासा दौरामुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी गृहपाठ किंवा उपक्रम मोबाईलवर देण्यास मज्जाव केल्याचे सांगितले.
प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या त्रिस्तरीय परीक्षेतून निवड झालेल्या १५० विद्यार्थ्यांनी इस्रो, तर ६० विद्यार्थ्यांनी नासा अभ्यासदौरा केला आहे. मुलींच्या आरोग्यासाठी ५५ शाळांमध्ये ‘फुलराणी कक्ष’ सुरू करण्यात आले असून, ९ ते १४ वयोगटातील मुलींच्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १२ हजार मुलींचे लसीकरण झाले आहे.
पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन आरंभ’, तर लैंगिक शोषणापासून संरक्षण, ‘गुड टच-बॅड टच’ आणि सायबर सुरक्षेसाठी ‘मिशन अभय’अंतर्गत वर्षभरात १० टप्प्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, आयडॉल शिक्षक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, शिक्षण संचालक कृष्णकांत पाटील, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी आमदार संजय कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक व पालक उपस्थित होते. शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार यांनी आभार मानले.