Ashadhi Wari| रत्‍नागिरीत घुमला माऊली... माऊली... विठुनामाचा गजर

वारकरी झाले तल्‍लीन; याची देही, याची डोळा रत्‍नागिरीकरांनी अनुभवली पंढरपूरची आषाढी वारी
Ashadhi Wari
रत्‍नागिरीत घुमला माऊली... माऊली... विठुनामाचा गजर
Published on
Updated on

रत्‍नागिरीः पंढरीची आषाढी एकादशी... वार शनिवार... सकाळी ७ वाजलेले... आषाढी वारीचा गजर करीत दिडींसाठी मारूती मंदिर परिसरात हजारो नागरिकांची वारकरी वेशभूषा परिधान करून उपस्‍थिती... महिला, तरूण-तरूणींची विशेष उपस्‍थिती... कोणी हातात भगवे झेंडे, बालकांनी विठ्ठलाची वेशभूषा साकारली तर कोणी वासूदेवाची वेशभूषा साकारली... गळ्याविणा, डोक्‍यावर तुलसी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्‍या महिला... कोणी पखवाज वाजवत होते... विठ्ठल विठ्ठल, बोला पुंडलिकवरदा हरिविठ्ठल... श्री ज्ञानेदव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय... असा जयघोष करीत प्रतिपंढरपूर असणारे विठ्ठल मंदिरात दिडींची सांगता करण्यात आली. पंढरपूरची वारी कोकणकरांनी मारुती मंदिर परिसरात याची देही, याची डोळा अनुभवली.

सर्वांनाच पंढरपूरच्‍या वारीत जाणे शक्‍य नसते. त्‍यामुळे मागील पाच वर्षांपासून सकल हिंदू समाजाच्‍या वतीने रत्‍नागिरीतच आषाढी वारीचा गजर करत दिंडी काढण्यात येत असते. यंदाच्‍या वर्षीही मोठ्या उत्‍साहात, भक्‍तिमय वातावरणात मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. प्रारंभी, जिल्‍हाधिकारी मनुज जिंदल, सीईओ वैदेही रानडे यांच्‍या हस्‍ते पादुका पूजन करून दिडींस सुरुवात झाली. चिमुकल्‍यापासून महिला, ज्‍येष्ठ नागरिक, तरूण-तरूणी सर्वांनी या दिडींत सहभाग नोंदवला होता.

विठुनामाचा जयघोष करत या दिंडीत महिला पुरुष मुदूंग घेऊन हरी नामाचा गजर करत रंगून गेले होते. हातामध्ये वीणा, मध्यभागी पालखी पारंपरिक पोषाखात महिला, तरुण-तरुणी होत्‍या. दिंडीत टाळ, मृदुंगाच्‍या गजरात अभंग गात, विठुनामाचा जयजयकार करत भक्‍त, वारकरी तल्‍लीन झाले होते. या दिंडीत भजनी मंडळांनी देखील सहभाग नोंदवला. लांजा, देवरुख येथूनही काही वारकरी दिंडीत सामील झाले होते. दिंडी पाहण्यासाठी रत्‍नागिरीकरांनी मोठी गर्दी केली. सर्वांच्‍या मोबाईल कॅमेऱ्यात दिंडीचे फोटो काढण्यात आले. ही दिंडी मारुती मंदिरपासून सुरुवात झाली तेथून माळनाका, जयस्‍तंभ, राम आळी, गोखले नाका, विठ्ठल मंदिरात सकाळी ११ च्‍या सुमारास सांगता झाली.

दिडींत प्रसाद, पाणी वाटप

रत्‍नागिरीत काढण्यात आलेल्‍या दिंडीत विविध संघटनांनी प्रसाद, पाणी, चहाचे वाटप केले. शिवप्रसाद महाजनी संघटनेच्या वतीने चिक्‍की, केळी वाटप, अद्वैत पेट्रोलपंपकडून दिंडी मार्गावर पाणी व्‍यवस्‍था, मंगला केटर्सकडून चहा, पाण्याची व्‍यवस्‍था करण्यात आली होती.

एकादशीनिमित्त घरोघरी उपवासाचे पदार्थ

आषाढी वारीनिमित्त रत्‍नागिरीकरांनी उपवास ठेवला होता. यावेळी घरोघरी नागरिकांनी बनवलेला फराळ खाल्‍ला. भगर, शाबुदाणा खिचडी, रताळ्याची खीर, केळी, सफरचंद, पेरू ही फळे खाल्‍ली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news