

देवरुख : भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच पावले उचलण्याची गरज आहे. यंदा पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे येत्या काही महिन्यांत पाणीटंचाईचे सावट गडद होण्याची चिन्हे आहेत. या भीषण समस्येची गंभीर दखल घेत दत्तनगर येथील 'श्री बाल मित्र मंडळ' आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत लोकसहभागातून परिसरातील 'चोरपऱ्या' येथे मातीचा मजबूत बंधारा उभारला आहे.
या उपक्रमामुळे 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या उक्तीचा प्रत्यय तर आलाच, शिवाय इतर प्रभागांतील नगरसेवक आणि नागरिकांसमोरही एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. यंदाच्या मोसमात पाऊस कमी झाल्याने जलसाठे अपूर्ण राहिले आहेत. पुढील काही दिवसांत उद्भवणाऱ्या भीषण जलसंकटाला सामोरे जाण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणे आणि जतन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. हीच जाणीव ठेवून जि. प. माजी सदस्य दिलीप बोथले यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तनगरमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या एकत्र येण्याने लोकशाही आणि लोकसहभागाचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. या बंधाऱ्यात पाणी साचल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारण्यास मोठा हातभार लागणार आहे. परिणामी, परिसरातील विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी वाढून नागरिकांना ऐन उन्हाळ्यातही मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमासाठी नगरसेवक सिद्धेश वेल्हाळ यांच्यासह सागर पोवार, संजय वेल्हाळ, प्रवीण सावंत, संदीप वेल्हाळ, नंदू बोथले, अमेय मांडवकर, राज शिंदे, संजय आंबेकर आणि बाळू नाखरेकर यांचे सहकार्य व श्रमदान लाभले. दत्तनगरच्या नागरिकांनी आणि बाल मित्र मंडळाने दाखवलेली ही तत्परता कौतुकास्पद आहे.
यंदाच्या कमी पावसामुळे भविष्यात निर्माण होणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर जर इतर प्रभागांतील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी या उपक्रमातून प्रेरणा घेऊन आपापल्या परिसरात असे वनराई व मातीचे बंधारे बांधले तर भविष्यातील भीषण पाणीटंचाईवर सहज मात करता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. दत्तनगरवासियांनी दाखवलेली ही तत्परता आणि एकता निश्चितच संपूर्ण शहरासाठी आणि इतर नगरसेवकांसाठी अत्यंत प्रेरणात्मक आहे.