Illegal Fishing : अनधिकृत मासेमारी रोखण्‍यासाठी ड्रोन सज्‍ज

ड्रोन गस्‍त सुरू झाल्‍यापासून तब्‍बल १५०० नौकांवर करण्‍यात आली कारवाई
Illegal Fishing
Illegal Fishing
Published on
Updated on

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सुरू असलेली अवैध आणि अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून एक अत्यंत प्रभावी पाऊल उचलण्यात आले आहे. समुद्र खवळलेला असताना किंवा खराब हवामानात गस्ती नौका समुद्रात पाठवणे धोक्याचे ठरत असल्याने मत्स्य विभागाने आता पारंपरिक गस्तीबरोबरच नियमांचा भंग करणार्‍यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवून कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रत्नागिरी किनारपट्टीवरील बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ड्रोन सुरू केल्‍यापासून आतापर्यंत सुमारे १५०० नौकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

किनारपट्टीवर सुरक्षा आणि गस्त घालण्यासाठी सागरी नौकांबरोबरच आता ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुरुवातीला तीन विशेष ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले होते. हे ड्रोन रत्नागिरी, साखरीनाटे आणि हर्णे या महत्त्वाच्या बंदर परिसरामध्ये कार्यान्वित करण्यात आले आहेत. या आधुनिक ड्रोनच्या मदतीने समुद्रात अवैध मासेमारी करणाऱ्या बोटींचा शोध घेतला जात असून, ड्रोनने टिपलेल्या छायाचित्रांच्या व पुराव्यांच्या आधारे मागील वर्ष दीड वर्षात सुमारे पंधराशे नौकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईदरम्यान नियम मोडणाऱ्या नौकाधारकांकडून लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. या यशस्वी प्रयोगानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणखी एक नवीन ड्रोन लवकरच उपलब्ध करून दिला जाणार असून, तो जयगड येथे कार्यान्वित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या ड्रोनची मारक क्षमता २४ किलोमीटर लांबीपर्यंत असल्याने १२ नॉटिकलपर्यंतच्या सागरी हद्दीत अचूक गस्त घालणे शक्य झाले आहे. मागील दोन दिवसांपासून मासेमारीला सुरुवात झाली असून, शासकीय आदेश मोडणार्‍यांवर कारवाईचा बडगा उचलण्‍यासाठी मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग सज्‍ज झाला आहे.

जिल्ह्यात ३ ड्रोनचे सुरळीत काम

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या तीन ड्रोन सुरळीतपणे काम करत आहेत. यामध्ये रत्नागिरी, साखरीनाटे आणि हर्णे या तीन प्रमुख बंदरांचा समावेश आहे. या ड्रोन गस्तीचा खर्च पाहिला, तर एका ड्रोनसाठी दिवसाला १६ हजार रुपये खर्च येतो. त्यानुसार तिन्ही ड्रोनचा मिळून एका दिवसाचा एकूण खर्च ४८ हजार रुपये इतका होतो. हे ड्रोन प्रत्यक्षात जेवढे दिवस वापरले जातात, फक्त त्याच दिवसांचे भाडे पुणे येथील संबंधित कंपनीला मत्स्य व्यवसाय विभागामार्फत दिले जाते. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ड्रोन दिवसातून तीनवेळा ठरवून दिलेल्या सागरी हद्दीत फेऱ्या मारून अचूक गस्त घालतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news