Ratnagiri News : जिल्‍हा, उपजिल्‍हा रुग्णालयाचे फायर ऑडिट लवकरच

दर सहा महिन्‍यांनी घेतली जाते चाचणी; जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक भास्‍कर जगताप यांची माहिती
Ratnagiri News
जिल्‍हा, उपजिल्‍हा रुग्णालयाचे फायर ऑडिट लवकरच
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : अमरावती व छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांनंतर राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यातील सर्व शासकीय, खासगी व धर्मादाय रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करण्याचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयासह तीन उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. उर्वरित रुग्णालयांचे ऑडिटही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अंतर्गत दापोली, कळंबणी व कामथे ही तीन उपजिल्हा रुग्णालये, तसेच मंडणगड, गुहागर, देवरूख, संगमेश्वर, लांजा व रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी रुग्णालयांमध्ये नियमितपणे अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी केली जाते. दर सहा महिन्यांनी आवश्यक चाचण्याही घेण्यात येतात. आतापर्यंत जिल्ह्यातील संबंधित रुग्णालयांपैकी बहुतांश ठिकाणी फायर ऑडिट पूर्ण झाले असून, सर्व रुग्णालये सुरक्षित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप यांनी सांगितले.

दरवर्षी इलेक्ट्रिक ऑडिट

शॉर्टसर्किट अथवा विद्युत बिघाडामुळे आग लागण्याच्या घटना टाळण्यासाठी रुग्णालयांचे दरवर्षी इलेक्ट्रिक ऑडिट केले जाते. यंदाही इलेक्ट्रिशियनमार्फत जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमधील विद्युत यंत्रणेची तपासणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

२६७ आरोग्य केंद्रांचे दरवर्षी होते फायर ऑडिट

जिल्‍ह्यातील जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण भागातील २६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फायर ऑडिट दरवर्षी केले जाते, अशी माहिती जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्‍ये यांनी दिली. आरोग्य केंद्रातील विद्युत यंत्रणा, सिलिंडर, जनरेटर, औषध साठवण कक्ष आणि इतर ज्‍वलनशील साहित्‍याची तपासणी केली जाते. रूग्णांच्‍या सुरक्षिततेला प्राधान्‍य देत दरवर्षी सर्व आरोग्य केंद्रांचे ऑडिट करण्यात येत असल्‍याचे आठल्‍ये यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news