

जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी :कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात जून, जुलै या दोन महिन्यात तब्बल ५० टक्के म्हणजेच १५ हजार ५८ मिमी, तर सरासरी १ हजार ६७३ मिमी इतका पाऊस पडला आहे. कोकणासाठी जुलै महिना लकी ठरला असून जून महिन्याचा बॅकलॉक भरून काढला आहे. एकंदरीत जुलै महिन्याच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यावरील दुबार पेरणी, पाणी टंचाई टळली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिमी इतका पाऊस पडतो. दरम्यान यंदाच्या वर्षी जून महिन्यात पाऊस कमीच पडला. त्यामुळे ऐन जून महिन्यात पाणीटंचाई, दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्याचा पहिल्या सात दिवसात जिल्ह्यात धो-धो पाऊस झाला. त्यामुळे जून महिन्याचा बॅकलॉक जुलै महिन्यात भरून निघाला आहे.
ऑगस्टमध्ये जोर वाढण्याची शक्यता
१ जून ते २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १ हजार ६७३ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर गतवर्षी याचवेळी ५८ टक्के तर सरासरी १ हजार ९८० मि.मी. इतका पाऊस झाला होता. एकंदरीत ३०० मिमी कमी पाऊस या महिन्यात पडला आहे. असे असले तरी जिल्ह्याला जुलै महिना लकी ठरला आहे. पुढील महिन्यात आणखीन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
दुबार पेरणी टळली
जून महिन्यात तीन ते चार वेळा पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांनी भात लागवड केली होती. मात्र, पाऊस कमी पडत असल्यामुळे पिके पिवळे, करपायला लागली होती. जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यावरील दुबार पिकाचे संकट टळले. जिल्ह्यात भात लागवड अंतिम टप्प्यावर आली असल्याचे दिसून येत आहे.